मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर अभिनेत्री अनेकदा तिच्या सोशल मीडियाद्वारे राजकीय आणि सामाजिक विषयांवरही तिची मतं व्यक्त करताना दिसते.
तेजस्विनी अनेकदा सोशल मीडियाद्वारे राज ठाकरे यांच्याविषयीही पोस्ट शेअर करताना दिसते. राज ठाकरे यांच्याबद्दलच्या तिच्या भावना ती सोशल मीडियाद्वारे कायमच व्यक्त करत आली आहे. नुकत्याच झालेल्या विजयी मेळाव्यातही तेजस्विनीने सहभाग घेतला होता. मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेत्रीने राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला होता. अशातच आता तिने राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर याबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे.
तेजस्विनी पंडितने अजब गजब या पॉडकस्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली. या मुलाखतीत तेजस्विनीला ‘राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तेजस्विनी म्हणाली, “ते मुख्यमंत्री झाले तर आपला महाराष्ट्र खूप भारी असेल. त्यांचं व्हिजन खूप छान आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिकपणे अनेकदा बोलली आहे आणि त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की, तो माणूस महाराष्ट्राला अगदी वरचं स्थान देतो, स्वत:च्या कुटुंबापेक्षाही जास्त. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे.”
तेजस्विनी पंडीत इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे तेजस्विनी म्हणते, “असे खूप कमी राजकारणी आहेत. ज्यांचं बोलणं मला खूप आवडतं. नितीन गडकरी, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे ही किती छान भाषणे करायची. शरद पवार सुद्धा… मला कधी कधी वाटतं, त्यांच्या मेंदूचं संशोधन केलं पाहिजे. इतके बुद्धीवान राजकारणी आहेत. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंमध्ये जे आहे ते त्यांच्याकडूनच येतं. राज साहेब बोलतात तेव्हा असं वाटतं की, ते बाळासाहेबांच्या मुखातूनच आलं आहे की काय असं वाटतं.”
यानंतर तेजस्विनी पंडित म्हणते, “पुर्वीची राजकारणी माणसं खूप वेगळी होती आणि तेव्हाचं राजकारणसुद्धा खूप वेगळं होतं. पुर्वीच्या राजकारणात नैतिकता होती, पॉवर होती. जे आता दिसत नाही. आता चित्र थोडंसं बिघडल्यासारखं वाटतं.” दरम्यान, तेजस्विनी लवकरच ‘ये रे ये रे पैसा ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.