Treesha Thosar Favourite Actors : बालकलाकार त्रिशा ठोसरला ‘नाळ २’ सिनेमासाठी यंदा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही चिमुकली पुरस्कार सोहळ्याला खास साडी नेसून गेली होती. त्रिशाच्या चेहऱ्यावरची निरागसता, तिचा आत्मविश्वास पाहून सगळेच भारावून गेले होते. तेव्हापासून त्रिशा संपूर्ण देशभरात चर्चेत आली. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांनीही त्रिशाला शुभेच्छा देण्यासाठी खास फोन केला होता. याशिवाय पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मॅसी अशा अनेक बॉलीवूड स्टार्सना ही चिमुकली भेटली.
त्रिशाला भविष्यात कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा आहे? असा प्रश्न तिला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर या चिमुकलीने आलिया भट्टचं नाव घेतलं आहे. त्रिशा नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…
“मला आलिया भट्ट खूप आवडतात. कारण, मी त्यांचा एक सिनेमा पाहिला होता…झुमका गिरा रे ( रॉकी और रानी की प्रेम कहानी ). जर, मला त्या भेटल्या तर मी त्यांना नक्की सांगेन की…मी तुमचा सिनेमा पाहिला होता. मला तो खूप आवडला आणि मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे.” असं त्रिशाने लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
याशिवाय काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्रिशाला तुझे फेव्हेरट अभिनेते कोण आहेत? असा प्रश्न विचारला गेला होता. हा प्रश्न ऐकताच त्रिशाने लगेच ‘रितेश देशमुख’चं नाव घेतलं. तिचं उत्तर ऐकून उपस्थित सगळेजण फार खूश झाले. यावर “याला म्हणतात मराठी बाणा!” असं म्हणत महेश मांजरेकरांनी त्रिशाचं कौतुक केलं होतं.
दरम्यान, ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदा मराठी सिनेविश्वातील बालकलाकारांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा रजत कमळ पुरस्कार यंदा ‘जिप्सी’ या मराठी चित्रपटासाठी कबीर खंदारे याला आणि ‘नाळ २’साठी त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना विभागून प्रदान करण्यात आला. यांच्यात त्रिशा वयाने सर्वात लहान होती. नुकतीच ती महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात झळकली होती.
