Umesh Kamat on relationship: अभिनेता उमेश कामत हा नुकताच ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा होती. १८ जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“तुम्हाला एकमेकांबद्दल आदर पाहिजे”
आता अभिनेत्याने ‘अजब गजब’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे जी नातं टिकवून ठेवते? यावर उमेश म्हणाला, “मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की तुम्हाला एकमेकांबद्दल आदर पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की, नात्यात मला काय हवंय ते व्हायला पाहिजे यापेक्षा समोरच्याला काय हवंय यामध्ये जर आपण आनंद मानला तर ते खूप सोपं होतं. समोरच्या व्यक्तीला आदर द्या, त्याच्या आनंदात जर तुम्ही आनंद मानलात तर प्रेम वाढतं.”
“जोडीदार असणं म्हणजे असं नाही की समोरच्या व्यक्तीला तिचं आयुष्य जगू द्यायचं नाही आणि मी माझं आयुष्य जगायचं नाही. जशी तुम्हालाही स्पेस हवी असते, तशी समोरच्या व्यक्तीलाही पाहिजे असते. स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिला आत्मविश्वास द्यायला पाहिजे. जर तिला आयुष्यात काही करायचं असेल, तिची काही स्वप्नं असतील ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही तिला हातभार लावला पाहिजे. तिला पाठिंबा दिला पाहिजे. तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. दोघांमधील ही देवाणघेवाण असते. दोघांनी तितकेच प्रयत्न करणं गरजेचं असतं.
“माझा स्वत:चा अनुभव…”
“मी माझा स्वत:चा अनुभव सांगतो. मुलींच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ऐकल्या की त्यांना बरं वाटतं. त्यांचे थोडे लाड केले पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यांना हवं तेव्हा लक्ष दिलं पाहिजे. जरी लक्ष देता येत नसेल तर ते तुम्ही बोललं पाहिजे. तुमची नाराजी, अपेक्षा तुम्ही सांगायला पाहिजेत. पुढे उमेश गमतीने म्हणाला की, यातील अर्ध्या गोष्टी मी करत नाही, पण मी अनुभव म्हणून सांगत आहे.
उमेश कामतने लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटशी लग्नगाठ बांधली आहे. ते कायमच एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. सध्या ते ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
दरम्यान, ‘येरे येरे पैसा ३’ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात उमेश कामतसह तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.