Vandana Gupte on Balasaheb Thackeray: वंदना गुप्ते या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ‘पसंत आहे मुलगी’, ‘तुझी माझी जमली जोडी’ , ‘लंपडाव’, ‘भेट’, ‘पछाडलेला’, ‘मातीच्या चुली’, अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
चित्रपटांसह त्यांनी मालिका व नाटकातदेखील काम केले आहे. सध्या त्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे, तसेच त्यांच्या नाटकाचे प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत. आता मात्र वंदना गुप्ते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
“बाळासाहेबांचं कलाकारांवर प्रचंड प्रेम…”
वंदना गुप्तेंनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले. तसेच बाळासाहेब ठाकरे त्यांना भूत म्हणायचे, असा खुलासा केला. वंदना गुप्ते म्हणाल्या, “बाळासाहेबांचा माझ्यावर अत्यंत जीव होता, ते मला भूत म्हणायचे. त्यांनी मला माझ्या नावाने कधी हाक मारलीच नाही.”
बाळासाहेब ठाकरेंबरोबरची लहानपणीची आठवण सांगत वंदना गुप्ते म्हणाल्या, “माझ्या आईला क्रिकेटची आवड होती, त्यामुळे आम्ही क्रिकेट बघायचो. एकदा मला तिथे बाळासाहेब दिसले. त्यांचा हात धरून मी पॅव्हिलियनमध्ये फ्री क्रिकेट मॅच बघायला गेले, ही त्यांच्याबरोबरची माझ्या लहानपणाची आठवण अश आहे, तेव्हापासून क्रिकेटचं वेड आहे.”
“बाळासाहेबांचं कलाकारांवर प्रचंड प्रेम होतं. त्यांना कलाकारांप्रति अतिशय आदर होता. कधीही मदतीसाठी विचारलं आणि त्यांनी नकार दिला असं झालं नाही. एका गार्डनला आईचं नाव देण्यात आलं. त्याच्या उद्घाटनाला ते स्वत: आले, त्यासाठी त्यांनी फंड्स दिले.”
“एकदा मी आणि शिरीष बाळासाहेबांच्या वाढदिवसाला गेलो होतो, त्यावेळी मातोश्रीच्या खिडकीतून पाहिलं, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीच्या अंगणात खचाखच गर्दी झाली होती. त्यांचा लोकांवर विलक्षण प्रभाव होता. त्यांचा कार्यकर्त्यांवर खूप जिव्हाळा, प्रेम होतं.”
“बाळासाहेबांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. मी त्यांच्याकडे गेले की मला कधीच कुठेच आडकाठी नसायची. त्यांच्या शेवटच्या दिवसातील त्यांचे शेवटचे फोटो माझ्याजवळ आहेत. अगदी चार-पाच दिवस आधीचे ते फोटो आहेत. त्यांच्याबरोबर फार घरगुती संबंध होते आणि असा माणूस होणार नाही. महाराष्ट्रासाठी इतका जीव टाकणारा माणूस पुन्हा होणार नाही. बाळासाहेब हे बाळासाहेब होते.”
दरम्यान, राजकारणात जाण्याची संधीदेखील मिळाली होती, पण मी गेले नाही, असेही वंदना गुप्ते म्हणाल्या. सध्या त्यांच्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाची मोठी चर्चा होताना दिसते. या नाटकात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि तन्वी मुंडले प्रमुख भूमिकेत आहेत.