मराठी सिने आणि नाट्यसृष्टी गाजवलेले अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल याबाबत घोषणा केली. त्यामुळे सध्या मनोरंजनसृष्टीतील कलाकार अशोक सराफ यांचं अभिनंदन करत आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी बोलत आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच एक खास पोस्ट लिहिली आहे. वर्षा यांनी या पोस्टमधून अशोक सराफांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – गौतमी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्ताने नवरा स्वानंद तेंडुलकरची खास पोस्ट, म्हणाला, “तू माझ्या पाठीशी…”

वर्षा दांदळे यांची पोस्ट वाचा

प्रिय भाई (अशोक सराफ) अभिनेते म्हणून मोठे आहातच, पण माणूस म्हणूनही खूप मोठे आहात. फक्त एकच नाटक..’अनधिकृत’ तुमच्यासह करण्याचं भाग्य मला मिळालं. नाटक अल्पजीवी ठरलं पण माणुसकीचे बंध मात्र आजपर्यंत टिकून आहेत. माझ्या अपघातानंतर एवढ्या कार्यबाहुल्यातूनही तुम्ही आणि निर्मितीताई मला नाशिकला भेटायला आलात…मला धीर दिलात…तुम्ही स्वतः एका मोठ्या अपघाताला सामोरी गेला होतात…ते अनुभव तुम्ही सांगितले आणि मीही यातून सुखरूप बाहेर पडेन अशी खात्री दिलीत.

आपल्या ‘अनधिकृत’ नाटकात तुमच्या पात्राला एक विचित्र आजार असतो…त्याचं वय हळूहळू मागे जातं.. म्हणजे ५०शीत माणूस शेवटी दीडदोन वर्षांचा होतो.. तुम्ही काय अफलातून तो बदल दाखवत होतात भाई…त्या नाटकातला तुमचा अभिनय हा आम्हा नवशिक्यांसाठी एक कार्यशाळा होती…दुर्दैवाने ते नाटक चाललं नाही…पण माझ्यासाठी ते नाटकं भाग्याचं ठरलं…तालमी दरम्यांची शिस्त, मुख्य म्हणजे वेळेवर येणे, मोबाईल बंद ठेवणे.. इतर अनावश्यक बडबड करणाऱ्या कलाकारांना शांत राहण्याचं महत्व पटवून देणे (अरे आपली एनर्जी वाचवा रे, हे तुमचं वाक्य ).. आपल्या भूमिकेचा बारकाईने अभ्यास करणे…किती आणि काय काय सांगू…खूप वर्ष झालीत पण अनधिकृत नाटक माझ्यासाठी आजही एक अधिकृत आठवणीचा खजिना आहे.

तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज जाहीर झाला…मनापासून अभिनंदन…पुरस्कार आज जरी जाहीर झाला असला तरी तुम्ही आम्हा सगळ्यांचे महाराष्ट्र भूषण होतात…आहात आणि जोपर्यंत मराठी अभिनयसृष्टी आहे तोपर्यंत राहालच… भाई तुमचं खूप खूप अभिनंदन

हेही वाचा – Video: राकेश बापटचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; ‘झी मराठी’च्या ‘या’ नव्या मालिकेत झळकणार, पाहा दमदार प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री वर्षा दांदळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मजेशीर व्हिडीओसह अभिनया क्षेत्राविषयी चाहत्यांशी संवाद साधतात. अलीकडेच त्यांच्या ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.