Vidyadhar Joshi Talk About Pigeon’s Issue: काही दिवसांपूर्वी मुंबईतील दादरच्या कबुतरखान्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. या कबुतरखान्यामुळे त्रास होत असल्याच्या, तसंच कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसांचा आजार होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी व्यक्त केल्या होत्या. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

मुंबई महानगरपालिकेच्या या कारवाईला मात्र काही लोकांनी विरोध केला होता. मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकरनेसुद्धा यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत कबुतरखान्याविरुद्धच्या करवाईला समर्थन दिलं होतं. अशातच आता याबद्दल अभिनेते विद्याधर जोशी यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शहरातील कबुतरखाने आणि कबुतरांमुळे होणाऱ्या गंभीर आजाराबद्दल विद्याधर जोशी यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. याबाबत ते असं म्हणाले, “कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसांचा खूप मोठा रोग होऊ शकतो. मला जितका त्रास झाला, तितका त्रास सगळ्यांनाच होईल असं नाही. आज मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला फुफ्फुसाचा त्रास आहेच.”

अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत पुढे विद्याधर जोशी म्हणाले, “मला एक गोष्ट कळत नाही, या कबुतरांमुळे सगळ्याच समाजाला त्रास आहे. हे माहीत असूनही त्या कबुतरखान्याला पाठिंबा कसा काय देऊ शकतात? यात कुठलीच जात, धर्म, लिंग, व्यवसाय, तुमचा पेशा किंवा आर्थिक स्तराचा काहीही संबंध नाही. सगळ्यांनाच यामुळे त्रास आहे. आता नाव घेऊ शकत नाही; पण ही माणसं डोक्यावर पडली आहेत का? हे असं पाहून मी फार अस्वस्थ होतो. सगळ्या समाजाची तुम्ही वाट लावत आहात.”

यानंतर त्यांनी सांगितलं, “आता शहराच्या बाहेर नॅशनल पार्कमध्ये हे कबुतरखाने सुरू करणार आहेत असं ऐकलं. पण एक दिवस त्या नॅशनल पार्कमध्येसुद्धा हे शहर येईलच. सध्याची परिस्थिती पाहता आणि एकंदरीत विकासाची गती पाहता लवकरच नॅशनल पार्कमध्ये शहर येण्याची शक्यता आहे. आता सगळीकडेच कठीण परिस्थिती झाली आहे. अनेक मोठमोठे डॉक्टर सांगूनही तुम्ही ऐकत नाही. त्यामुळे काळजी तरी किती घ्यायची, हाच प्रश्न आहे.”

विद्याधर जोशी इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, विद्याधर जोशी हे मराठी इंडस्ट्रीधील लोकप्रिय कलाकार आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विनोदी, गंभीर तसेच नकारात्मक भूमिकांद्वारे त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.