Vidyadhar Joshi on Riteish Deshmukh:अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या चित्रपट आणि अभिनयातून तो कायमच प्रेक्षकांची मने जिंकत असतो. तसेच अनेकदा रितेश देशमुखच्या वागण्याचेदेखील कौतुक होताना दिसते. त्याच्याबरोबर काम केलेले कलाकार त्याचे अनेकदा कौतुक करताना दिसतात. काही कलाकार त्याचे किस्सेदेखील सांगतात.

आता ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनी एका मुलाखतीत रितेश देशमुखबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “रितेश देशमुखबरोबर मी खूप काम केलं नाही, मी फक्त ‘वेड’मध्येच काम केलं. त्यातही मला वाटतं की मी ७-८ दिवस काम केलं. तो चित्रपटाचा दिग्दर्शक आणि चित्रपटात माझा जावई असल्याने आमचा संबंध सतत होता.

“मला इतकं आश्चर्य…”

पुढे ते म्हणाले, “जेव्हा मी आजारी होतो, त्यावेळी रिलायन्सच्या इस्पितळात उपचार घेत होतो, ते त्याला कसं कळलं वगैरे मला माहीत नाही. त्याने स्वत: डॉक्टरांना फोन केला. तो स्वत: डॉक्टरांना भेटण्यासाठी आला. त्याने त्यांना सांगितलं की माझ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे. त्याच्याकरिता तुम्ही आवश्यक गोष्टी करा. त्यांची काळजी घ्या. थोडक्यात, तो स्वत: तिथे आला, त्यानंतर तो माझ्या पत्नीशी संपर्क ठेऊन होता.”

“मी जिथे उपचार घेत होतो, तिथे स्वत:चा मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही. जर मोबाईल पाहिजे असेल तर ते त्यांचा मोबाईल देतात. तुम्ही त्यांच्या मोबाईलवरून फोन करू शकता. टॅब देतात, टीव्ही अशा सगळ्या गोष्टी देतात, पण, रुग्ण स्वत:चा मोबाईल वगैरे इस्पितळात घेऊन जाऊ शकत नाही. तिथे रितेश देशमुखने दवाखान्यातील लोकांची परवानगी घेऊन त्याने मला खास ‘वेड’ चित्रपट दाखवला. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं की इतका चांगुलपणा त्याच्याकडे आहे.

“मी त्याच्याबरोबर केलेला पहिलाच सिनेमा होता. आम्ही सीनच्या शूटिंगपुरतेच एकत्र असायचो, त्यानंतरही फार गप्पा मारत होतो असं काही नव्हतं. पण, असं सगळं असताना तो स्वत: येतो, मला सिनेमा दाखवण्याची तसदी घेतो, तो मला सिनेमा दाखवतो, ही गोष्ट खरोखरच मनाला भिडली; म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात चांगली माणसं आहेतच, त्यांच्यामुळेच ती क्षेत्र, ते देश चालतात. अशी चांगली माणसं वाढली पाहिजेत; रितेश कमाल आहे”, असे म्हणत विद्याधर जोशींनी रितेश देशमुखचे कौतुक केले.

‘वेड’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रितेश-जिनिलीया देशमुख आणि जिया शंकर हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात अशोक सराफ, विद्याधर जोशी यांच्या भूमिकांनीदेखील लक्ष वेधले होते. विद्याधर जोशींनी मुरली शिंदे ही भूमिका साकारली होती. रितेश देशमुखने या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, रितेश देशमुख हा सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. अनेकदा तो जिनिलीयाबरोबर विनोदी रील्स शेअर करत प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.