Ashok Saraf : कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी नुकताच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. दमदार अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत गेली अनेक दशकं ते रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अलीकडच्या काळात स्टार होणं सोपं झालंय पण, स्टार होऊन आपलं स्टारडम जपणं तसेच चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांनाच जमतं.

आज घराघरांत प्रेक्षक त्यांना ‘अशोक मामा’ म्हणून ओळखतात. मराठीसह हिंदी कलाविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांनी नुकत्याच ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना ‘मामा’ अशी हाक मारतात? याबद्दल खुलासा केला आहे.

“तुम्हाला मामा का म्हणतात?” याबद्दल अभिनेते म्हणाले, “मी त्यावेळी कोल्हापूरमध्ये शूटिंग करत होतो आणि तिथे लोक प्रेमाने एखाद्याला हाक मारायची असेल तर ‘मामा’ म्हणतात. कोल्हापूरमध्ये कोणी कोणाला फार असं काका वगैरे म्हणत नाही. त्यावेळी कोल्हापुरात माझ्याबरोबर एका प्रोजेक्टच्या निमित्ताने थिएटर इंडस्ट्रीमधले वर्कर्स, लाइटमन, स्पॉटबॉय असे अनेकजण काम करत होते. त्या लोकांसमोर मला नेमकी काय हाक मारावी असा प्रश्न होता. आता ते मला अशोक म्हणून कसा आवाज देणार? ‘सर’ म्हटल्यावर त्यांना एवढी आपुलकी वाटत नव्हती.”

“ते सगळे तंत्रज्ञ कोल्हापूरचे होते. मी जेव्हा त्यांच्या समोर गेलो तेव्हा, त्यांना मामा म्हणणं सर्वात जास्त सोयीस्कर वाटलं. कारण, त्यांच्यापैकी एका वर्करची लहान मुलगी सेटवर आली होती. त्यावेळी त्या गृहस्थाने त्याच्या मुलीला माझी ओळख, “हे बघ अशोक मामा” अशी त्यांनी करून दिली. सुरुवातीला त्यांनी लेकीला मामा अशी ओळख करून दिली आणि नंतर ते गृहस्थ स्वत: मला मामा म्हणून लागले. आता त्यांनी ‘मामा’ हाक मारायला सुरुवात केल्यावर, मग ते सगळेजण मला मामा म्हणू लागले. शेवटी मग मी संपूर्ण मराठी इंडस्ट्रीचा अशोक मामा म्हणून ओळखला जाऊ लागलो. कोल्हापुरात मामा म्हणणं खूपच मानाचं समजलं जातं. कालांतराने मग कुठेही शूटिंग करा चाहते अशोक मामा असा आवाज द्यायचे.” असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशोक सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय अभिनेते नुकतेच ‘अशी ही जमवा जमवी’ सिनेमात झळकले. या सिनेमात त्यांच्याबरोबर वंदना गुप्तेंनी स्क्रीन शेअर केली होती.