मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणारा ‘बंजारा’ हा मराठी चित्रपट या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने अभिनेते शरद पोंक्षे, सुनील बर्वे, भरत जाधव आणि दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत संवाद साधला.

शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे हे तिन्ही अनुभवी कलाकार ‘बंजारा’ या चित्रपटात आधुनिक काळाला साजेशा रूपात प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यांची वेशभूषा आणि त्यांच्या भूमिका हे आजवरच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. त्यासंदर्भात बोलताना, अभिनेते भरत जाधव यांनी आम्ही जुन्या काळातील पद्धतीनुसार चित्रपटात काम करून धमाल केली आहे, परंतु एका विशिष्ट वयात आल्यानंतर सद्या:स्थितीचा विचार करून बदलावे लागते. काळानुसार झालेला बदल विचारात घेऊन काम करावे लागते. मात्र, चांगल्या भूमिका असल्या तर काम करण्यात मजा आहे, नाहीतर थांबलेले बरे असते. मला हा बदल स्वीकारण्याचा आणि काही वर्षे थांबण्याचा छान फायदा झाला, असे मत व्यक्त केले. शिवराज वायचळ याने ‘आता थांबायचं नाय’, स्नेह पोंक्षे याने ‘बंजारा’ चित्रपटाचे कथानक ऐकवले. या तरुण मंडळींनी माझा विचार केला आणि संबंधित भूमिका वेगळ्या वाटल्यामुळे चित्रपटात काम करण्यास होकार दिला. चांगल्या भूमिकांचे स्वागत केलेच पाहिजे. सध्याची तरुण पिढी वेगळा विचार करते आहे, यामध्येच आम्हाला प्रचंड आनंद आहे. विशेष बाब म्हणजे या नवीन मुलांच्या वेगळ्या विचारामुळे आम्ही स्वत:ही एक पाऊल पुढे जातो, असेही त्यांनी सांगितले.

‘बंजारा’ या चित्रपटाद्वारे अभिनेते शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेहने दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्याबद्दल बोलताना स्नेहला सुरुवातीपासूनच चित्रपटक्षेत्रात काम करायचे होते आणि या दृष्टीने तो सातत्याने चित्रपटनिर्मितीचा अभ्यास करीत होता, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले. ‘जागतिक चित्रपटाचा अभ्यास करण्यासाठी बहुसंख्य जागतिक स्तरावरील चित्रपट आणि ऑस्कर विजेत्या चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया तो पाहतो. त्यानंतर यावर माझ्याशी गप्पाही मारतो. स्नेहने आत्मविश्वासाने ‘बंजारा’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिण्यासह दिग्दर्शन केले आहे. ही गुंतवून ठेवणारी गोष्ट असून मैत्रीचे बंध गुंफलेले आहेत. या प्रवासाच्या कथेत छान फुलत जाणारी मैत्री आहे आणि एक उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांची चाललेली धडपड दाखविण्यात आली आहे. निखळ मैत्रीतून सुरू झालेल्या प्रवासाची गोष्ट मांडण्यात आली आहे. हा चित्रपट पाहून प्रत्येकाला जुनी मैत्री आठवेल आणि जुन्या मित्रांना फोन करून ‘रियुनियनचा प्लॅन’ करतील. तसेच हा चित्रपट पांढऱ्याशुभ्र बर्फाने पांघरलेल्या ‘सिक्कीम’च्या निसर्गरम्य वातावरणात आणि पहाडांमध्ये चित्रित झाला आहे. त्यामुळे हा निसर्ग मोठ्या पडद्यावर पाहण्यात मजा आहे आणि त्यासाठी ‘बंजारा’ चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा’, असे आवाहनही पोंक्षे यांनी केले.

विशिष्ट दृष्टिकोनातून चित्रपटनिर्मिती आवश्यक

‘आपण दृष्टिकोनात कुठेतरी कमी पडतो, असे मला वाटते. कारण २० कोटींच्या निर्मितीखर्चात ‘कांतारा’, ‘मंजुमल बॉइज’ आदी सुपरहिट चित्रपटांची निर्मिती होते, त्यामुळे आपणही कमी निर्मितीमूल्यामध्ये दर्जेदार चित्रपट बनवू शकतो. मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम आशयघन चित्रपटांची निर्मिती होते, मात्र काही प्रमाणात त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आपण वेगळ्या दृष्टिकोनातील १० चित्रपट एकामागोमाग प्रदर्शित करून वेगळी सुरुवात केली पाहिजे’, असे स्नेह याने सांगितले.

…तर एक वेगळा प्रभाव पडतो

‘काळानुरूप प्रेम, मैत्री, प्रवास, गूढता आदी विविध प्रकारांतील चित्रपटांची निर्मिती आपल्याकडे झालेली आहे आणि यामध्ये काही प्रमाणात साम्यही आढळते. कलाकार म्हणून चित्रपटांकडे पाहताना आम्ही आमच्या वयानुसार व विचारानुसार पाहात असतो. परंतु सध्याची नवीन पिढी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते, तेव्हा चित्रपट कसा वेगळ्या पद्धतीने आणि रंजकतेने होऊ शकतो, याची जाणीव होते’, असे मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केले. ‘आपण नेहमी हिंदी चित्रपटांमध्ये ग्लॅमर पाहतो. त्यानुसार मराठी चित्रपटातील नायक, नायिका, मित्र किंवा इतर पात्रांची रूपेरी पडद्यावर वेगळ्या पद्धतीने व मोठ्या स्तरावर मांडणी केली, तर एक वेगळा प्रभाव पडतो आणि नेहमीच्या चित्रपटाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीतील चित्रपट पाहायला आवडतात. तसेच आम्हा कलाकारांनाही वेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतात. ही नवे दिग्दर्शक आम्हाला वेगळ्या पद्धतीने बघण्याची दृष्टी देत आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे’, असेही त्यांनी सांगितले.

‘सिक्कीम’मध्ये चित्रीकरण

‘मी ‘सिक्कीम’ला पाच वर्षांपूर्वी फिरण्यासाठी गेलो होतो, त्यामुळे मला तिथल्या जागा माहिती होत्या. जेव्हा ‘बंजारा’ चित्रपट लिहिला, तेव्हा ‘सिक्कीम’ आणि ‘उत्तराखंड’ ही दोन ठिकाणे चित्रीकरणासाठी डोक्यात होती. त्यामुळे मी या दोन्ही ठिकाणी जाऊन आलो. मात्र संहितेच्या अनुषंगाने चित्रीकरणासाठी सर्वात अनुरूप ‘सिक्कीम’ होते, त्यामुळे त्या ठिकाणीच चित्रीकरण करण्याचे निश्चित केले’, असे स्नेहने सांगितले. त्यानंतर सिक्कीममधील सर्व ओळखीच्या माणसांशी चर्चा केली आणि विविध परवानगीच्या अनुषंगाने तिथे चित्रीकरण होऊ शकते का, यासंदर्भात विचारणा केली. माझ्या मते सिक्कीमच्या आसपास असणाऱ्या दार्जिलिंगजवळ ‘बर्फी’ चित्रपटाचे काही चित्रीकरण झाले होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत सिक्कीममध्ये संपूर्ण एका चित्रपटाचे चित्रीकरण झाले नव्हते. त्यामुळे तिथे चित्रीकरण झाले पाहिजे, अशी इच्छाच त्या ठिकाणच्या मंडळींनी बोलून दाखविली.

‘ट्रोलर्सला शून्य महत्त्व’

कादंबरीची दोन पाने वाचून दोनशे पन्नास पानांच्या पुस्तकात नेमके काय लिहिले आहे, हे कसे कळणार? त्यामुळे ‘ट्रेलर’ पाहून चित्रपटाचा अंदाज बांधता येत नाही. ‘ट्रोलर्स’ नावाची एक जमात आहे आणि ही जमातच फक्त टीका करते. कोणताही चांगला माणूस काहीही माहिती नसताना कधीही कोणाला शिव्या देत नाही आणि या माणसांकडे स्वत:ची विविध कामे सोडून टीका करायला वेळही नसतो. काही माणसे कोणताही संबंध नसताना सतत थुंकत असतात, एका जागी बसून थुंकतात आणि उठूनही जात नाहीत, एका जागी बसूनच पिचकारी मारण्याचे काम करतात. त्याप्रमाणे ‘ट्रोलर’ ही जमातसुद्धा काहीही माहिती नसताना सतत थुंकत राहते, असे स्पष्ट मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ‘मराठीतील सर्वात ब्लॉकबस्टर चित्रपट असणाऱ्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाबाबत सर्वात वाईट लिहिले गेले, मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ट्रोलिंगचा काही परिणाम नाही, ट्रोलर्स काहीही बडबडू देत… त्यांना कोण विचारते आहे? मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. ट्रोलर्सला शून्यापेक्षाही कमी महत्त्व देतो आणि त्यामुळे काहीही फरक पडत नाही. आम्ही आमचे चांगले काम करत राहणार’, असेही शरद पोंक्षे यांनी सांगितले.