लोकसत्ता प्रतिनिधी
मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे सहकारी दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या सुधीर कुलकुर्णी यांनी लिहिलेला, सिम्मी – रॉबिन या दिग्दर्शक द्वयीचा ‘रील स्टार’ हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून प्रसिद्ध अभिनेता – दिग्दर्शक प्रसाद ओक याचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
भानुदास नावाचा एक रस्त्यावरील विक्रेता आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘रील स्टार’ हा चित्रपट मांडतो. आपल्या आयुष्यातील एका छोट्याशा स्वप्नाच्या पूर्ततेसाठी ते झगडतात; मात्र अनपेक्षित संकटांच्या मालिकेत अडकून त्यांची ही कहाणी हळूहळू समकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वास्तवात प्रवेश करते. शेवटी त्याला स्वत:च्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांविरुद्ध अस्तित्त्वासाठी लढा द्यावा लागतो.
गाजलेल्या भारतीय चित्रपटांशी जोडले गेलेल्या मल्याळम चित्रपट उद्याोगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. ‘दृश्यम’ या प्रसिद्ध मल्याळम चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक विनू थॉमस यांनी गुरू ठाकूर आणि मंदार चोळकर यांच्या गीतांना संगीत दिले आहे. चित्रपटात मिलिंद शिंदे, उर्मिला जगताप, कैलाश वाघमारे, अनंत महादेवन, स्वप्नील राजशेखर, अभिनव पाटेकर, रुचिरा जाधव, तनिष्का मानसी, मास्टर अर्जुन अशा विविध कलाकारांच्या भूमिका आहेत. जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.