Rohit Raut : ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या शोमुळे रोहित राऊत घराघरांत लोकप्रिय झाला. या शोमध्ये तो फायनलिस्ट ठरला होता. यानंतर रोहितने काही वर्षांपूर्वी इंडियन आयडलमध्ये सहभाग घेतला होता. आजच्या घडीला रोहितला मराठी कलाविश्वातील आघाडीचा गायक म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक ट्रेंडिंग अल्बममधली तसेच गाजलेल्या सिनेमांमधली गाणी गायली आहेत. आता दिवाळीच्या मुहूर्तावर रोहितने आपल्या चाहत्यांबरोबर एक खास गोष्ट शेअर केली आहे.
रोहित म्हणतो, “नमस्कार! मी रोहित राऊत…मी बरीच वर्षे गाणी गातोय, तुमच्यासमोर परफॉर्म करतोय, तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय. पण, या सगळ्यात माझं एक स्वप्न आहे जे मला पूर्ण करायचंय आणि यासाठी मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची साथ गरजेची आहे. हे स्वप्न मी आणि माझ्या बाबांनी मी लहान असताना पाहिलं होतं; जेव्हा आम्ही दोघं सोनू निगम यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो. साडेतीन तास जो माणूस स्वत:ची नवनवीन गाणी गातोय आणि लोक त्याला पाहण्यासाठी वेडी आहेत आयुष्यात तो क्षण…ती गोष्ट मला साध्य करायचीये.”
“कलाकार म्हणून एक पाऊल पुढे टाकण्यासाठी कधी-कधी स्पर्धेत उतरावं लागतं. त्यामुळेच I-Popstar या नव्या स्पर्धेत मी सहभागी होतोय. यासाठी तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळी ओरिजनल, यापूर्वी कुठेही न ऐकलेली गाणी प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा नसून सर्व श्रोत्यांसाठी एक पर्वणी आहे. कारण, या शोमध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक स्वत: लिहिलेलं, नवीन गाणं तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे. त्यामुळे खूप-खूप प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असूदेत. I-Popstar मध्ये सहभागी झाल्यावर तुम्ही सगळे असेच माझ्या पाठिशी राहा आणि माझ्यावर खूप प्रेम करत राहा…थँक्यू!” असं रोहितने सांगितलं.
रोहित राऊत I-Popstar या शोमध्ये सहभागी झाला आहे. यामध्ये त्याने परफॉर्म केलेलं पहिलंच गाणं परीक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. हा शो रोहितचे चाहते व संगीतप्रेमी MX Player वर पाहू शकतात.
दरम्यान, I-Popstar मध्ये सहभागी होत असल्याचा निर्णय जाहीर केल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “ऑल द बेस्ट रोहित…तुझी खूप छान-छान गाणी आम्हाला ऐकायला मिळोत” अशी कमेंट कार्तिकीने त्याच्या पोस्टवर केली आहे. याशिवाय यशोमन आपटे, आशीष पाटील, कुणाल भगत, अभिजीत खांडकेकर या कलाकारांनी त्याला या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.