गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)ची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली तसेच काही हॉलिवूडच्या कलाकारांनीही या महोत्सवाला हजेर लावली. नुकतंच हॉलिवूडचे अभिनेते व निर्माते मायकल डग्लस यांनीही इफ्फीमध्ये हजेरी लावली. या महोत्सवादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे मायक ल डग्लस चर्चेत आहेत.
चित्रपट महोत्सवादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुकही मायकल यांनी केले आहे. तसेच या चित्रपट महोत्सवाबद्दलही त्यांनी कौतुकाचे उद्गार काढले. मायकल म्हणाले, “या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात ७८ हून अधिक परदेशी देशांचे प्रतिनिधित्व केले जाते, हे जणू भारतीय चित्रपटांच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे जे साऱ्याजगभरात प्रसिद्ध आहे. मला असं वाटतं की तुमचं भविष्य योग्य लोकांच्या हातात अत्यंत सुखरूप आहे. ही तर सुरुवात आहे.”
याबरोबरच मायकल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर व पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचा उल्लेख करत त्यांच्याविषयीही कौतुकाचे उद्गार काढले. मायकल त्यांच्याबद्दल म्हणाले, “मी नमूद केल्याप्रमाणे मला वाटते की अनुराग ठाकूर आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत चित्रपटांच्या निर्मितीसाठी अगदी सढळ हाताने पैसे देण्यात आले आहेत अन् ही आजच्या काळात अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे.”
जात, धर्म, लिंग यांचा विचार न करता चित्रपट लोकांना एकत्र बांधून ठेवतात असंही मायकल म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार “आपण कितीही वेगवेगळ्या भाषांमध्ये बोललो तरी चित्रपटाची भाषा एकच आहे. जगातील कोणत्याही कोपऱ्यातील प्रेक्षकाला ती भाषा बरोबर समजते. चित्रपट आपल्याला समृद्ध करतो आणि आणखी जवळ आणतो माझ्यामते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.”