भारतीय वंशाची २४ वर्षीय भारतीय तरुणी नीना डावुलिरी हिने अमेरिकी सौंदर्य स्पर्धा जिंकली असून ती ‘मिस अमेरिका २०१४’ ठरली आहे. ती अगोदर मिस न्यूयॉर्क होती. बॉलिवूडमधील मिश्रनृत्यांनी तिने परीक्षकांची वाहवा मिळवली. नीना ही वडिलांप्रमाणेच डॉक्टर होऊ इच्छिते व ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्याने तिला पन्नास हजार डॉलरची शिष्यवृत्ती मिळणार आहे. न्यूजर्सीतील अॅटलांटिक सिटी येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत तिने हा मुकुट पटकावला. सौंदर्य मुकुट पटकावल्यानंतर तिने पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सौंदर्य स्पर्धा संस्थेने विविधता अंगीकारली याचा आनंद आहे. नवीन ‘मिस अमेरिका’ कोण आहे हे मुलेही दूरचित्रवाणीवर उत्सुकतेने बघत होती. सांस्कृतिक स्पर्धेला यात विविधतेची जोड मिळाली आहे. आईवडील लग्न ठरवून देणार आहेत की कसे वगैरे अनेक सांस्कृतिक गैरसमज तिने दूर केले. आधी मी ‘मिस न्यूयॉर्क’ होते व आता ‘मिस अमेरिका’ आहे याचा अभिमान वाटतो, असे ती म्हणाली.
अमेरिकेच्या राज्यातील किमान ५३ सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होत्या. मिस कॅलिफोर्निया असलेली क्रिस्टल ली ही उपविजेती ठरली. मिस ओकलाहोमा केसली ग्रिसवर्ल्ड ही तिसरी आली. सायंकालीन गाऊन, लाइफस्टाइल, तंदुरुस्ती, बुद्धिमत्ता, व्यक्तिगत मुलाखत याच्या आधारे निकाल देण्यात आला. मिस न्यूयॉर्कने मिस अमेरिका स्पर्धा जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मॅलरी हागन यांनी मिस न्यूयॉर्क असताना मिस अमेरिकी स्पर्धा जिंकली होती.
टीव्ही अँकर डोळय़ांची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात त्याविषयी विचारले असता दावुलिरी हिने सांगितले, की प्लॅस्टिक सर्जरीच्या आपण विरोधात आहोत, त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत, पण आत्मविश्वास गमावला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. नीनाने बॉलिवूड फ्युजन नृत्य सादर केले. तिला मिस न्यूयॉर्क जाहीर केल्यानंतरच्या काळात ती नकुल देव महाजन यांच्या ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ या टीव्ही शोवर काम करीत होती. गेली पंधरा वर्षे तिने भारतात येऊन शास्त्रीय नृत्य शिकले आहे.
दावुलिरी हिचा जन्म सायराक्युज येथे झाला व ती ओकलाहोमाला गेली. तेथून दहा वर्षांची असताना मिशिगनला आली. दावुलिरी हिच्याकडे मिशिगन विद्यापीठाची ब्रेन बिहॅवियर व कॉन्गिटिव्ह सायन्स या विषयाची पदवी आहे.