Miss World 2025 : हैदराबादमधील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये ३० मे (शनिवार) ७२ वा ‘मिस वर्ल्ड’ सोहळा पार पडला. मनोरंजन जगतातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमात मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्रीला ‘मिस वर्ल्ड २०२५’चा खिताब देण्यात आला. गेल्या वर्षीची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्झकोवाने ओपल सुचाताच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट चढवला आणि ‘मिस वर्ल्ड २०२५’ची विजेती म्हणून ओपलचं नाव घेतलं.
‘मिस वर्ल्ड २०२५’ मध्ये इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमासूने दुसरा, तर पोलंडची मेय क्लाजदाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. ‘मिस वर्ल्ड २०२५’च्या स्पर्धेत एकूण ११० देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील नंदिनी गुप्तानेदेखील ‘मिस वर्ल्ड २०२५’ मध्ये भाग घेतला होता. परंतू, नंदिनी अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. सुचाताने आपली प्रतीभा, आत्मविश्वास आणि सामाजिक योगदानाच्या माध्यमातून सर्वांना मागे टाकत विजयाचा क्राऊन जिंकला.
ओपल सुचाता ही थायलंडच्या फुकेतमध्ये लहानाची मोठी झाली. ती आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी घेत असून ती मॉडेलसुद्धा आहे. स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी तिने बरंच सामाजिक कार्य केलं आहे. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिच्या शरीरात कर्करोगाची गाठ आढळली होती. ही गाठ सौम्य प्रकारची असली तरी थायलंडमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल आणि निदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
‘मिस वर्ल्ड २०२५’ या सोहळ्यात २०१७ ची मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी, विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती आणि बॉलीवूड अभिनेता सोनू सूद आणि नम्रता शिरोडकर, जॅकलिन फर्नांडिस तसंच अभिनेता ईशान खट्टरहेदेखील सहभागी झाले होते. या सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, ओपलने यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स २०२४’ मध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये ती तिसरी उपविजेती होती. यानंतर तिने ‘मिस वर्ल्ड थायलंड २०२५’चा मुकुटही जिंकला होता. त्यानंतर आता तिने ‘मिस वर्ल्ड २०२५’च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं आहे.