बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये अक्षय एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तो लवकरच ‘मिशन मंगल’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून अक्षयने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय गंभीर रुपात दिसून येत आहे.
आर. बाल्की आणि जगन शक्ती यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटामध्ये अक्षय मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये त्याच्यासोबत विद्या बालन, तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन आणि शर्मन जोशी या कलाकारांची फौजही झळकली आहे.
“एक अशा व्यक्तीची कथा जो भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेला. ताकद, धैर्य आणि कधीही हार न मानणाऱ्याची ही कथा. भारताची मंगळ मोहिमेची खरी कथा. १५ ऑगस्ट रोजी तुमच्या भेटीला”, असं कॅप्शन अक्षयने या पोस्टरला दिलं आहे.
पुढे तो म्हणतो, “या स्वातंत्र्यदिनी स्वप्नांना पंख मिळतील. अनेक वर्षांपासून हॉलिवूडमध्ये स्टार-ट्रेक, स्टारवॉर्स आणि ग्रॅव्हिटी यासारखे अंतरिक्षावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचं, नव्या माहितीचं आकलन झालं. त्यामुळेच अशा चित्रपटांचा एक भाग व्हावं अशी माझी फार इच्छा होती. या चित्रपटांमुळे आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला नवी माहिती मिळेल आणि त्यांच्या कल्पना शक्ती, जिज्ञासा या साऱ्यांला नवी प्रेरणा मिळेल”.
‘मिशन मंगल’ हा चित्रपट फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत. तसेच हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा दिसणार आहेत.