Must Watch 7 Films Of Veteran Actor Mohanlal : मोहनलाल हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांत काम केलं असून, चार दशकांपासून ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. अशातच नुकतंच त्यांना ‘दादासाहेब फाळके’ हा मनोरंजनविश्वातील नामांकित पुरस्कार जाहीर झाला आहे.
येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मोहनलाल चार दशकं चित्रपटसृष्टीत काम करीत असून, या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मोहनलाल देशातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळेच आम्ही तुम्हाला त्यांच्या ओटीटीवरील काही चित्रपटांची यादी देणार आहोत, जे प्रत्येकाने पाहायलाच हवे.
दृश्यम
‘दृश्यम’ हा एक उत्कंठावर्धक क्राइम थ्रिलर सिनेमा असून, त्याचं लेखन व दिग्दर्शन जितू जोसेफ यांनी केलं आहे. हा चित्रपट मोहनलाल यांच्या अभिनय कौशल्याचं उत्कृष्ट उदाहारण आहे. या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे त्याचा हिंदी रिमेकही बनवण्यात आला. या चित्रपटात मोहनलाल यांनी जॉर्जकुट्टी नावाच्या केबल टीव्ही ऑपरेटरची भूमिका साकारली आहे, जो आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. हा चित्रपट ‘जिओहॉटस्टार’वर उपलब्ध आहे.
थुदरूम
‘थुदरूम’ ही एक अॅक्शन-थ्रिलर फिल्म आहे, जी शण्मुगम ऊर्फ बेन्झ नावाच्या एका साध्या टॅक्सीचालकाची कथा सांगते. जेव्हा त्याची गाडी एका ड्रग्ससंबंधित प्रकरणात अडकते, तेव्हा तो अत्यंत कठीण परिस्थितीत सापडतो.
ही फिल्म ‘जिओहॉटस्टार’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
कंपनी
राम गोपाळ वर्मा दिग्दर्शित ‘कंपनी’ हा चित्रपट एका अंडरवर्ल्ड गँगची कथा सांगतो, जी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या खऱ्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात मोहनलाल यांनी आयपीएस वीरापल्ली श्रीनिवासन ही भूमिका साकारली आहे, जी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. हा सिनेमा ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ’ आणि ‘झी ५’वर उपलब्ध आहे.
इरुवर
मणिरत्नम यांची ही एक अप्रतिम कलाकृती आहे, ज्यात मोहनलाल यांनी आनंदन या संघर्ष करणाऱ्या अभिनेत्याची भूमिका साकारली आहे, जो पुढे जाऊन सुपरस्टार बनतो आणि नंतर राजकारणात प्रवेश करून एक नेता होतो. ‘इरुवर’ हा चित्रपट संतोष सिवन यांच्या समृद्ध छायाचित्रणासाठी, मनाला भिडणाऱ्या कथा मांडणीसाठी आणि विशेषतः ए. आर. रहमान यांच्या संगीतातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे. हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ’ आणि यूट्यूबवर उपलब्ध आहे.
स्पडिकम
‘स्पडिकम’ हा एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे, जो ३० मार्च १९९५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मोहनलाल यांनी आडू थोमा ही व्यक्तिरेखा साकारलेली. एक बंडखोर मुलगा, जो आपल्या वडिलांपासून दुरावलेला असतो. ‘ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर’ हा चित्रपट पाहता येईल.
वनप्रस्थम
‘वनप्रस्थम’ हा एक मानसशास्त्रीय कालखंडावर आधारित नाट्यमय चित्रपट आहे. त्यात मोहनलाल यांनी कथकली कलाकाराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २१ मे १९९९ रोजी ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये प्रदर्शित झाला होता. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी फ्रान्समध्ये आणि जानेवारी २००० मध्ये भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘जिओहॉटस्टार’वर हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
थन्मात्रा
‘थन्मात्रा’ हा आणखी एक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करू शकता. समीक्षकांनी गौरवलेला हा एक मल्याळम नाट्यपट आहे, ज्यामध्ये मोहनलाल यांनी प्रभावी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रमेशन नायर या मध्यमवर्गीय सरकारी कर्मचाऱ्याची आणि कुटुंबप्रेमी व्यक्तीची कथा सांगितली आहे, ऐन तारुण्यात त्याला अल्झायमर झाल्याचं निदान होतं. ‘जिओहॉटस्टार’वर हा चित्रपट उपलब्ध आहे.
मोहनलाल यांचा प्रवास केवळ बॉक्स ऑफिसवरील यशापुरताच मर्यादित नाही, तर त्यांनी मल्याळम सिनेमाला वास्तवतेची आणि जागतिक आकर्षणाची नवीन ओळख दिली आहे. कौटुंबिक नाटकं असोत, थ्रिलर्स, ऐतिहासिक महाकाव्य किंवा समकालीन कथा प्रत्येक शैलीत त्यांनी सादर केलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे.