Mrunal Thakur on Anushka Sharma : अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा एका जुन्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. काही काळापूर्वी बिपाशा बासूबद्दलचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती बिपाशाची खिल्ली उडवताना दिसली होती. त्यामुळे मृणालला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर अभिनेत्रीने माफीही मागितली. आता मृणालचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये ती एका प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली उडवताना दिसत आहे. मुलाखतीत मृणालला विचारण्यात आले की, एका सुपरस्टार अभिनेत्रीमुळे तिचा कोणताही प्रोजेक्ट गमवावा लागला आहे का? मृणाल ठाकूरचा हा व्हिडीओ रेडिटवर अपलोड करण्यात आला आहे.
मृणाल ठाकूरने कोणाची खिल्ली उडवली?
यावर मृणाल म्हणाली की, जर तिने काही म्हटले, तर तिला ट्रोल केले जाईल. पण नंतर ती म्हणाली, “अनेकदा मी स्वतः नकार दिला. कारण- मी तयार नव्हते. नंतर मला जाणवलं की, जर मी त्यावेळी तो चित्रपट केला असता, तर मी स्वतःला गमावलं असतं. तो चित्रपट सुपर हिट झाला आणि त्याचा फायदा त्या अभिनेत्रीला झाला. आता ती अभिनेत्री काम करत नाहीये; पण मी काम करत आहे. मला झटपट प्रसिद्धी नको आहे. कारण- जे काही झटपट येते, ते निघूनही जाते.”
आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, मृणालने कोणावर कमेंट केली. लोक म्हणत आहेत की, मृणालने कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिची कमेंट अनुष्का शर्मावर आहे. कदाचित मृणाल ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहे तो ‘सुलतान’ असेल, ज्यामध्ये अनुष्काने सलमान खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. खरं तर, जेव्हा मृणाल तिच्या ‘जर्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस १५’मध्ये आली होती, तेव्हा सलमानने स्वतः सांगितले होते की, मृणालला पहिल्यांदा ‘सुलतान’साठी घेतले जाणार होते. सलमानने असेही म्हटले होते की, त्यावेळी मृणालची शरीरयष्टी पैलवानासारखी नव्हती.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मृणाल ट्रोल होत आहे. ”ती आज काम करत नाहीये; पण मी करत आहे. स्वतःबद्दल चांगले वाटण्यासाठी इतरांना कमी लेखणाऱ्या महिलांचा मी खरोखर आदर करू शकत नाही. ”जर हे अनुष्काबद्दल बोलत असेल तर… मृणाल खरोखरच मूर्ख आहे.” सलमान आणि अनुष्काची केमिस्ट्री चांगली होती. मृणालने चित्रपट केला नाही हे चांगले झाले.” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
बिपाशावर केली होती कमेंट
काही दिवसांपूर्वी मृणालची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती. त्या मुलाखतीत ती बिपाशा बासूच्या शरीरावर कमेंट करताना दिसली होती. व्हिडीओ बराच जुना होता; पण बिपाशा बासूने कोणाचेही नाव न घेता प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मृणालने माफी मागितली. ती म्हणाली की, ते विधान सुरुवातीच्या काळातील होते. कोणालाही दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. अलीकडच्या काळात मृणाल वेगाने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिला अनेक चांगले चित्रपट मिळाले आहेत आणि तिच्या अभिनयाचेही कौतुक झाले आहे.