MTV हे जगप्रसिद्ध म्युझिक चॅनल लवकरच इतिहासजमा होणार आहे. चार दशकांहून अधिक काळ संगीतप्रेमींच्या मनावर राज्य केलेले हे चॅनेल ३१ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे बंद होणार आहे. याबाबत पॅरामाउंट ग्लोबलने अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये MTV Hits, MTV 80s, आणि MTV 90’s सारख्या संगीतप्रधान चॅनेल्सचा समावेश आहे.

MTV चॅनेल्स बंद का होत आहेत?

गेल्या काही वर्षांमध्ये संगीत आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठा बदल झालेला आहे. यूट्यूब, स्पॉटिफाय आणि ॲपल म्युझिकसारख्या माध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पारंपरिक संगीत टीव्ही चॅनेल्सवरील प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी अनेक संगीत व्हिडीओसाठी ओळखला जाणारा MTV हळूहळू रिअ‍ॅलिटी शो आणि पॉप-कल्चर आधारित कंटेंटकडे वळला. डिजिटल युगातील प्रेक्षकांच्या सवयींमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.

भारतामधील MTV चा प्रवास

भारतामध्ये MTV ची सुरुवात १९९६ साली झाली. त्याकाळात हा चॅनेल तरुणाईच्या जीवनशैलीचा एक भाग बनला होता. संगीत व्हिडीओ, संवाद, ट्रेंड्स, फॅशन या सर्व गोष्टी MTV ने ठरवल्या. २०१६ मध्ये MTV Indies चॅनेल बंद करून MTV Beats सुरू करण्यात आला, ज्यावर रसिकांना दिवसभर संगीत ऐकायला मिळायचं. सध्या भारतातही MTV ने संगीतापेक्षा मनोरंजनावर लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र, भारतातील चॅनेलही बंद होईल की नाही, याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.

नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या भावुक प्रतिक्रिया

MTV चॅनेल्स बंद होणार असल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी याला ‘एका युगाचा अंत’ म्हटले आहे. MTV चॅनेल्स बंद होण्याबद्दल एकाने म्हटलं, “एक काळ होता, जेव्हा नवीन गाणी शोधण्यात एक वेगळीच मजा होती. आता सर्व काही सहज आणि लगेच मिळतं, पण त्या काळाची मजा काही औरच होती”.

तर आणखी एकानं “९० च्या दशकात ज्यांचं बालपण MTV बघत गेलं, त्यांच्यासाठी ही बातमी निश्चितच निराशाजनक आहे.” तसंच “MTV, त्या सुंदर दिवसांसाठी मनापासून धन्यवाद” अशा प्रतिक्रियाही प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.