अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यावर एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खान, त्याचा मित्र आरबाज मर्चंट आणि फॅशन डिझायनर मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर केले. तसेच या प्रकरणात हाती लागलेले पुरावे सादर करत त्याच्या कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी दिलीय. या प्रकरणात आज आर्यनला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
आर्यन खानची बाजू मांडत वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले, की आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. “आर्यनकडे बोर्डिंग पास नव्हता आणि कोणतीही सीट किंवा केबिन नव्हते. तसेच जप्ती करताना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नाहीत. त्याला फक्त व्हॉट्स अॅप चॅट्सच्या आधारावर अटक करण्यात आली आहे”, असे ते म्हणाले. तसंच ते आज न्यायालयासमोर आर्यनसाठी जामीनाचा अर्ज करणार आहेत.
क्रूझच्या अध्यक्षाचे मत?
एनसीबीने शनिवारी रात्री गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला. दिल्लीतील एका इव्हेंट कंपनीने २, ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी प्रवासी क्रूज जहाजांवर पार्टी आयोजित केली होती. एनसीबीने Cordelia Cruise चे अध्यक्ष आणि सीईओ जर्गन बेलोम यांचे जबाब नोंदवले आहेत. “एनसीबीने आम्हाला क्रू ऑपरेशनची प्रक्रिया समजून घेण्यासाठी बोलावले आणि आम्ही एनसीबीला सहकार्य करत आहोत. मुंबई किनाऱ्यावरून जहाज निघाले तेव्हा सुमारे १ हजार प्रवासी होते,” असं बेलोम म्हणाले. तसेच “आमचे जहाज ताब्यात घेण्यात आले नसून ते त्याच्या पुढच्या थांब्यासाठी गेले असून सोमवारी परत येईल. आयोजक वेगळे असल्याने जहाजावर असलेल्या पाहुण्यांची आम्हाला माहिती नव्हती,” असंही त्यांनी सांगितलंय.
एनसीबी चीफ एसएन प्रधान काय म्हणले?
एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणामागे काही ‘बॉलिवूड कनेक्शन’ आहे का, याची तपासणी आम्ही करत आहेत. तसेच या प्रकरणापाठी मुख्य आरोपी कोण आहेत, यासंदर्भात आमचा तपास सुरू आहे.”
नेमकं प्रकरण काय?
अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहेत. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता. आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आली आहे.