“माझे सासरे हार्ट पेशंट, त्यांना काही झालं तर…?”; क्रांती रेडकरचा संतप्त सवाल

त्यामुळे ती वेळ मिळेल आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल अशी आशा करते,” असे क्रांती रेडकर म्हणाली.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. काही तासांपूर्वीची त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत.या गंभीर आरोपांनंतर क्रांतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित योग्य तो न्याय करण्याची विनंती केली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी ‘एबीपी माझा’शी बोलताना क्रांतीने मुख्यमंत्र्याच्या भेटीची वेळ मागितली आहे. तसेच “या सर्व टेन्शनमुळे माझ्या सासऱ्यांना काय झालं तर आम्ही कुठे जायचं?” असा सवाल क्रांतीने केला आहे.

क्रांती रेडकर काय म्हणाली?

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वेळ मिळावी, यासाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना विनंती केली आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत. त्यासोबत उद्धव ठाकरेंचे आणि त्यांचेही संबंध चांगले आहेत. त्यामुळे आमच्या ज्या काही समस्या आहेत, त्या मांडण्यासाठी मला फक्त दोन मिनिटांची वेळ हवी आहे, यासाठीच मी हे पत्र लिहिलंय. त्यामुळे ती वेळ मिळेल आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल अशी आशा करते,” असे क्रांती रेडकर म्हणाली.

“या सर्व प्रकरणावरुन जी वैयक्तिक टीका होतेय, त्याला कुठे तरी आळा बसावा. ते जरी या गोष्टी थेट करत नसतील तरी अप्रत्यक्षरित्या त्यांची माणसे या गोष्टी करत आहेत. या सर्व गोष्टी आता कुठे तरी थांबल्या पाहिजेत. कारण एका मराठी माणसाला महाराष्ट्रात हे सर्व सहन करावं लागत असेल तर आम्ही कुठे जायचं. आम्ही कोणाकडे बघायचं उद्धव ठाकरेंवर माझा विश्वास आहे, ते नक्कीच योग्य न्याय करतील. मला त्यांनी पत्र लिहावं इथपर्यंत पोहोचवलं. एखाद्या माणसावर सर्व बाजूने इतका दबाव आणला जातो.

माझे सासरे ७० वर्षांचे आहे. त्यांना हृदयविकाराचा आजार आहे. त्यांची दोन वेळा हार्ट सर्जरी झालीय. जर त्यांना टेन्शनने काही झालं, तर आम्ही कुठे जायचं, कोणाकडे बघायचं? माझ्या नणंदेला लिवरचा आजार आहे. तिचे काही ना काही आरोग्याच्या तक्रारी आहेत. मलाही दोन मुली आहेत, त्या अद्याप तीन वर्षांचीही झालेली नाहीत. त्यांना एका मुलीच्या खांद्यावर टाकून मी लढायला बाहेर पडतेय. ज्या देशात दुर्गादेवीला सेलिब्रेट केलं जातं, झाशीच्या राणीला सेलिब्रेट केलं जातं. तिथे एका सर्वसामान्य मुलीला न्याय का मिळू शकत नाही? असे सवालही तिने उपस्थित केले.

मला किरीट सोमय्या, रामदास आठवले हे नेते समर्थन करत आहेत, मी त्यांना भेटणार आहे. इथे राजकीय काहीही नाही. या सर्वांना हे चुकीचं सुरु आहे हे दिसतंय, त्यामुळे हा लढा राजकीय नाही. हा एका आईचा, बायकोचा, बहिणीचा लढा आहे. आम्ही पोलिसात तक्रार केली आहे, पण कोर्टात तारीखवर तारीख मिळेल, पण आता मला लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे, असेही तिने सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडले आहेत. याप्रकरणी वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंच्या कुटुंबावर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याप्रकरणी क्रांतीने पत्रकार परिषदे घेत आरोप आणि ट्विटरवरील पोस्टवर आक्षेप नोंदवला होता.

ट्विटरवरुन काल नबाव मलिक यांनी समीवर वानखेडेंचा जन्मदाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट केला होता. मात्र यावरुन क्रांतीने कालच सोशल मीडियावरुन स्पष्टीकरण दिलं होतं. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता क्रांती संतापली. आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे. एक ट्विटरसारखं माध्यम आहे तर उद्या कोणीही उठून काहीही लिहील. आम्ही तुमचा सन्मान करतो. तर तुम्ही तसं वागा, असा खोचक सल्ला क्रांतीने नबाव मलिक यांना दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: My father in law is a heart patient what if something happens to him sameer wankhede wife kranti redkar gets angry nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या