scorecardresearch

‘काश्मीर फाइल्स’वरील वक्तव्यानंतर नदाव लॅपिडच्या विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह बदल, लिहिलं “डाव्या विचारसरणीचे…”

नदाव लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्भवलेला वाद हा त्यांच्या विकिपीडिया पृष्ठापर्यंत पोहोचला आहे.

‘काश्मीर फाइल्स’वरील वक्तव्यानंतर नदाव लॅपिडच्या विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह बदल, लिहिलं “डाव्या विचारसरणीचे…”
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

इफ्फीच्या समारोप समारंभात विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ला इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ चित्रपट म्हटलं होतं. त्यानंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. चित्रपटाला ‘व्हल्गर’ म्हणण्यामागचं कारण नदाव यांनी सांगितलं आणि पुन्हा चित्रपटाबद्दल भाष्य केलं. नंतर त्यांनी हा अप्रतिम चित्रपट आहे, पण तो राजकीय प्रचारक असल्याचंही म्हटलं होतं. दरम्यान आता हा वाद नदाव लॅपिड यांच्या विकिपीडिया पृष्ठापर्यंत पोहोचला आहे.

ज्या लोकांना लॅपिड यांनी चित्रपटाबद्दल केलेलं भाष्य आवडलं नाही, त्यांनी नदाव यांच्या विकिपिडीया पृष्ठात काही बदल केले आहेत. विकिपीडियावर मुक्तपणे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी, लॅपिडच्या खात्यातील माहितीत एकूण २१ बदल करण्यात आले होते. ते बदल एकूण आठ वेगवेगळ्या आयपी अॅड्रेसवरून करण्यात आले होते.

‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड

लोक आणि बॉट्सद्वारे विकिपीडियावर करण्यात आलेल्या बदलांमध्ये त्यांचा ‘लेफ्ट विंगर’ म्हणजेच डाव्या विचारसरणीचे असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ते अपमानास्पद वक्तव्य करणारे आहेत आणि त्यांनी प्रसिद्धीसाठी चित्रपटावर पाच मिनिटं टीका केली आहे, असंही म्हटलंय. याशिवाय त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता यानंतर, विकिपीडियाने भारतातील वापरकर्त्यांना या पृष्ठात बदल करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला.

‘द काश्मीर फाइल्स’संदर्भातील वादानंतर नदाव लॅपिड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्याला व्हल्गर म्हणालो कारण…”

लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्याविरोधात अनेक जण भाष्य करत आहेत. काही जण एका सरकारी कार्यक्रमात उघडपणे जाहिरात केलेल्या चित्रपटाविरूद्ध बोलल्याबद्दल त्याचं कौतुक करत आहेत. तर काही जण काश्मिरी हिंदूंच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावर टीका करत आहेत.

काय म्हणाले होते लॅपिड

इस्त्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते लॅपिड या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगंडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे,” असं लॅपिड म्हणाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 13:37 IST

संबंधित बातम्या