Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Love Story : अभिनेता नागा चैतन्यने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करू लागला होता. या नात्यामुळे त्याला आणि शोभिताला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्यने शोभिताबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. या दोघांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात कोणत्या चित्रपटाच्या सेटवर नाही तर इन्स्टाग्रामवर झाली होती. एका इमोजीमुळे दोघं एकमेकांच्या संपर्कात आले.

कुठे आणि कशी झाली पहिली भेट?

‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील जगपती बाबू यांच्या ‘जयम्मू निश्चियमु रा’ या टॉक शोमध्ये नागा चैतन्यने हजेरी लावली होती. यावेळी त्याने सांगितलं की, इन्स्टाग्राममुळे त्याची आणि शोभिताची भेट झाली होती. चैतन्य हसला आणि म्हणाला, “आम्ही इन्स्टाग्रामवर भेटलो. मला कधीच वाटले नव्हते की मी माझ्या जोडीदाराला तिथे भेटेन. मला तिच्या कामाची माहिती होती. एके दिवशी, जेव्हा मी शोयु (क्लाउड किचन) बद्दल पोस्ट केले, तेव्हा तिने इमोजीसह कमेंट केली. मी तिच्याशी गप्पा मारू लागलो आणि लवकरच आम्ही भेटलो.”

एका मजेदार ‘रॅपिड-फायर सेगमेंट’दरम्यान जेव्हा त्याला विचारले गेले की तो कशाशिवाय जगू शकत नाही, तेव्हा चैतन्यने लगेच उत्तर दिले, “शोभिता, माझी पत्नी!” त्याने त्याच्या पहिल्या १०० कोटी रुपयांच्या चित्रपट ‘थंडेल’ मधील एका गाण्यावर शोभिताने दिलेल्या प्रतिक्रियेशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला. तो हसला आणि म्हणाला, “‘बुज्जी थल्ली’ गाण्याबद्दल ती माझ्यावर नाराज होती. खरंतर, तिने मला ते टोपणनाव दिले होते. तिला वाटले की मी दिग्दर्शकाला (चंदू मोंडेटी) चित्रपटात ते वापरण्यास सांगितले आहे. ती काही दिवस माझ्याशी बोलली नाही – पण मी ते का करू?”

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजी लग्न केले. हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओजमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. हा सर्वांत चर्चेत राहिलेला विवाहसोहळा ठरला आणि त्यामागचं कारणही तसंच होतं. अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्यने हे दुसरं लग्न केलं होतं. समांथा व नागा चैतन्य यांनी ६ ऑक्टोबर २०१७ साली लग्न केलं, पण लग्नाच्या काही वर्षांनंतर या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि २०२१ साली त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली.