ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर आता त्यांच्या खासदारपदाची जागा भरुन काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पंजाबमधील गुरदासपूर मतदारसंघातून विनोद खन्ना यांनी खासदारपद भूषवलं होतं. अभिनयासोबतच राजकारणाच्या पटलावरही त्यांचा वावर उल्लेखनीय होता. पण, त्यांच्या जाण्यानंतर संसदेत गुरदासपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य व्यक्तीची शोधाशोध सुरु झाली आहे. मुख्य म्हणजे विनोदजींच्या जागेसाठी चित्रपटसृष्टीतून अभिनेता अक्षय कुमार आणि ऋषी कपूर यांची नावं समोर येत आहेत.
दरम्यान, विनोद खन्ना यांच्या निधनानंतर मुंबईत आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये भाजपच्या कोणत्याही राजकारण्याने हजेरी लावली नव्हती. त्यातच भाजपशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘हे काही राज्यसभेचं तिकीट नाहीये. विनोदजींच्या जागी जे कोणी त्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल त्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. त्यातही सद्यस्थिती आणि पंजाबच्या निवडणुकांचे निकाल पाहता भाजपसाठी हे तितकं सोप नाहीये.’
‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गुरदासपूरच्या जागेसाठी होणाऱ्या या राजकारणामध्ये अक्षय कुमार आणि ऋषी कपूर यांच्या नावांच्या चर्चा रंगत आहेत. या चर्चेत जनसामान्यांमध्ये असणारी अक्षय कुमारची प्रतिमा पाहता त्याचा पगडा भारी दिसतो आहे. सैन्यदलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती असणारी जबाबदारी ओळखत खिलाडी कुमारने आजवर राबवलेले उपक्रम पाहता तो सध्याच्या घडीला ‘मिस्टर भारत’ आहे, असं म्हणायला हरकत नसल्याचं मतही व्यक्त करण्यात आलंय. त्या तुलनेत ऋषी कपूर याच्या नावालाही प्राधान्य देण्यात आलं असलं तरीही त्यांच्या नावाबद्दल अजूनही साशंकता कायम आहे. कारण, ऋषी कपूर ट्विटरवर खूप अवाजवी टिवटिव करत असले तरीही त्यांचे ट्विट कधीकधी अचुक मुद्द्यांकडेही लक्ष वेधतात. पण, सध्यातरी त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही या जागेसाठी प्रबळ दावेदार नसल्यामुळे ऋषी यांचच नाव पुढे येत असल्याचं मतही मांडण्यात आलं आहे.
खिलाडी कुमार आणि ऋषी कपूर या दोघांनीही आजवर बऱ्याच सामाजिक कामांमध्ये हातभार लावला आहे, त्याशिवाय या दोन्ही कलाकारांची प्रतिमा आणि देशाच्या प्रगतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन पाहता गुरदासपूरच्या मतदारसंघासाठी कोणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुळात खिलाडी कुमार राजकारणात प्रवेश करणार का.. हासुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या अनेकांच्याच मनात घर करत आहे. दरम्यान, अक्षयव्यतिरिक्त या जागेसाठी रविना टंडन, सोनू निगम, सनी देओल यांची नावंही समोर येत होती. पण, भाजपशी संलग्न सूत्रांच्या म्हणण्यानुसार चाहत्यांच्या गर्दीपेक्षा मतदारांची मतं मिळवणारा एखादा चेहराच गुरदासपूर मतदार संघासाठी योग्य आहे.