नवाजुद्दीन सिद्दीकी बऱ्याच दिवसांपासून एक सुपरहिट चित्रपट देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसला असला तरी, त्याचे बहुतेक चित्रपट एकतर ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत किंवा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आहेत. अशातच तो आता पुन्हा एकदा खलनायक म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी तो बॉलीवूडमध्ये नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटात खलनायक म्हणून दिसणार आहे.

नवाजुद्दीनच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘सैंधव’. याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याल चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दग्गुबती व्यंकटेश मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नवाजची तीच जुनी खलनायकी स्टाईल टीझरमध्ये पाहायला मिळते.

आणखी वाचा : ‘धूम ४’ मध्ये झळकणार शाहरुख खान? दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शेअर केला खास व्हिडीओ

नवाजुद्दीनबरोबरच व्यंकटेश देखील जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. चित्रपटाचे दोन वेगवेगळे पैलू टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत. फॅमिली ड्रामापासून सुरू झालेली गोष्ट दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर येऊन थांबताना टीझरमध्ये दिसत आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असून चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि व्यंकटेश यांच्याशिवाय आर्या, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, आंद्रिया जेरेमिया, सारा, जयप्रकाश हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पुढील वर्षी म्हणजेच १३ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सैंधवचे दिग्दर्शन शैलेश कोलानू यांनी केले आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम व हिंदी अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.