सध्या ओटीटी आणि वेब सीरिजची चांगलीच चलती आहे. मोठ- मोठे स्टार कलाकारही ओटीटीवर पदार्पण करताना दिसतात. या नव्या संधीचा पूर्ण वापर करताना दिसून येत आहेत. पण अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीला मात्र आता वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा नाही. सध्या तो आगामी चित्रपटांच्या तयारीकडे लक्ष देताना दिसत आहे. आगामी काळात त्याच्याकडे ‘नो लँड्स मॅन’, ‘अदभुत’, ‘टीकू वेड्स शेरू’, ‘हीरोपंती २’ आणि ‘जोगिरा सारा रा रा’ हे चित्रपट आहेत. पण या यादीत एकही वेब सीरिज नाही.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाझुद्दीन सिद्दीकीनं वेब सीरिजमध्ये काम करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘आज काल बऱ्याच वेब सीरिज तयार केल्या जात आहेत. पीआर आणि मार्केटिंगमुळे त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे. प्रत्येक वेब सीरिजचं कौतुक होतं. यामुळे बराच गोंधळ उडत आहे. कोणती वेब सीरिज अधिक चांगली आहे किंवा कोणती वेब सीरिज चांगली नाही. हे समजत नाही.’

वेगवेगळे पुरस्कार मिळवणाऱ्या नवाझुद्दीनचं म्हणणं आहे की, ‘डिजिटल स्पेसमध्ये गुणवत्तेपेक्षा वेब सीरिजच्या संख्येकडे जास्त लक्ष दिलं जातं. पूर्वीप्रमाणे यात आता काही नाविन्य राहिलेलं नाही. आता सर्वजण अनेक कलाकार ओटीटीवर फोकस करताना दिसतात. पण मी एकाच प्रकारचं काम करणारा व्यक्ती नाही. माझं मन मला असं करू देत नाही. त्यामुळे सध्या मी वेब सीरिजमध्ये काम करु इच्छित नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकी वेब सीरिजमध्ये काम करणार नसला तरीही ओटीटीवर मात्र त्याचे बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत. याबाबत तो म्हणतो, ‘मी वेगवेगळ्या चित्रपटात काम करतो मग तो ओटीटीवर प्रदर्शित होणार असेल तरी माझी हरकत नसते. कारण अभिनेत्यासाठी हा एक मोठा मंच आहे. यामुळे माझ्या कामात वैविध्य राहतं आणि मला कंटाळा येत नाही. या वर्षात मला लव्ह स्टोरी असलेल्या चित्रपटांमध्ये काम करायचं आहे.’