टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रा राष्ट्रीय नायक बनला. २३ वर्षीय खेळाडू अ‍ॅथलेटिक्स प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय आणि देशातील दुसरा वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ठरला. नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर आता त्याच्यावरील बायोपिकची चर्चा जोरात सुरूये. सोशल मीडियावर सुद्धा नेटकऱ्यांनी नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये कोण अभिनेता असावा, याबाबत वेगवेगळे पोस्ट शेअर करण्यास सुरूवात केलीय. पण ज्याच्यावर बायोपिक येईल त्या नीरज चोप्राला त्याच्या भूमिकेत कुणाला पहायला आवडेल, याबाबत त्याने प्रतिक्रिया दिलीय.

हरियाणाच्या पानीपतमधल्या एका छोट्याश्या गावातून आलेल्या नीरज चोप्राची प्रेरणादायी कहाणी आता रूपेरी पडद्यावर पाहण्याची इच्छा त्याचे फॅन्स व्यक्त करत आहेत. त्याच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता असावा यावर सोशल मीडियावर लागोपाठ चर्चा सुरूयेत. यावर नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिलीय. “जर माझ्यावर बायोपिक करण्याचं ठरवलंच तर माझ्या बायोपिकमध्ये मला हरियाणाचा रणदीप हुड्डाला पहायला आवडेल. बॉलिवूडमधून अक्षय कुमारही मला खूप आवडतो.”, असं नीरज चोप्राने उत्तर देताना सांगितलं.

रणदीप हुड्डाने केलं ट्विट

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उज्वल केले. नीरज चोप्राच्या विजयानंतर अभिनेता रणदीप हुड्डाने एक ट्विट शेअर सांगितलं की, “मी तर आधीच म्हणालो होतो…नीरज चोप्रा, रवि दहिया, दीपक पुनिया आणि बजरंग पुनिया आपला दम दाखवणार”

 

अक्षय कुमारने दिल्या शुभेच्छा

नीरजेन सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही वेळानेच बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सुद्धा सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगवर आला होता. नीरजला शुभेच्छा देत ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमारने लिहिलं की, “हे सोनं आहे…नीरज चोप्राने इतिहास रचल्याबद्दल त्याचे मनापासून अभिनंदन. तू कोट्यावधी लोकांच्या डोळ्यातील आनंदाश्रूचं कारण आहेस. खूपच सुंदर.” या ट्विटमध्ये अक्षय कुमारने ‘गोल्ड’ हा शब्द इंग्रजीत कॅपिटलमध्ये लिहिलं होतं. ‘गोल्ड’ त्याच्या चित्रपटाचं नाव सुद्धा आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु ते इंग्रज होते, भारतीय नव्हते. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.