OTT Release This Week : ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यात ओटीटीवर काय पाहावं, असा विचार तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात ओटीटीवर तुम्हाला ॲक्शन, कॉमेडी, थ्रिलर यांसह इतरही जॉनर पाहायला मिळतील.
ऑक्टोबरचा दुसरा आठवडा म्हणजेच ६ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान कोणते नवीन चित्रपट आणि सीरिज विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात.
वॉर २
बॉलीवूडचा अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वॉर २’ चित्रपट १४ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकली आहे. हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी बनवला होता आणि त्याची निर्मिती वायआरएफने केली होती. हा चित्रपट ९ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सर्च: द नैना मर्डर केस
क्राईम-थ्रिलर चाहत्यांसाठी, कोंकणा सेन शर्मा या आठवड्यात एक सीरिज घेऊन येत आहे. ‘सर्च: नैना मर्डर केस’चे दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केले आहे. कोंकणाने एसीपी संयुक्ता दासची भूमिका साकारली आहे. ही सीरिज डॅनिश हिट चित्रपट ‘द किलिंग’ चा भारतीय रिमेक आहे. ही सीरिज १० ऑक्टोबरला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.
कुरुक्षेत्र
पौराणिक कथेवर आधारित अॅनिमेशन चित्रपट ‘महावतार नरसिम्हा’च्या ब्लॉकबस्टर यशाने अलीकडेच सर्वांना आश्चर्यचकित केले. यामुळे प्रेक्षकांच्या अॅनिमेटेड चित्रपट आणि सीरिजबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. आता, या आठवड्यात ‘कुरुक्षेत्र’ नावाची अशीच एक सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. ही सीरिज १० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
स्थळ
‘स्थळ’ हा जयंत दिगंबर सोमलकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. नंदिनी चिकटे मुख्य भूमिकेत आहे. ‘स्थळ’ या चित्रपटात महिलांना लग्न करताना रंग, उंची यावरून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल सांगण्यात आलं आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबरला ‘झी ५’वर प्रदर्शित होणार आहे.