जवळपास सात वर्षांपूर्वी एका चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं, तो चित्रपट आता ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने दमदार कमाई केली होती. आयएमडीबीवरही याला खूप चांगलं रेटिंग मिळालं आहे. आता अचानक ओटीटीवर ट्रेंडिंग असलेला हा सिनेमा कोणता? ते जाणून घेऊयात.
ओटीटीवरील टॉप ट्रेंडिंग चित्रपटांची यादी दर आठवड्याला बदलत राहते. पण सध्या, एका नवीन चित्रपटाने नाही तर ७ वर्षे जुन्या चित्रपटाने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. तो देशातील टॉप १० यादीत ट्रेंड करत आहे. ट्रेंडिंग असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘रेड’ आहे.
चित्रपटातील कलाकार
२०१८ मध्ये ‘रेड’ (Raid Trending on OTT) हा क्राइम ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अजय देवगणने मूख्य भूमिका केली होती तर इलियाना डिक्रूझ मुख्य अभिनेत्री होती. त्याचबरोबर सौरभ शुक्ला, अमित सियाल, शीबा चड्ढा, प्रवीण सिंह सिसोदिया आणि देवास दीक्षित सारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. अजय देवगणचा ‘रेड’ सिनेमा सत्य घटनांवर आधारित क्राईम ड्रामा फिल्म आहे. १९८० च्या दशकात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीवर बेतलेला हा चित्रपट आहे.
६ व्या क्रमांकावर ट्रेंड करतोय रेड
‘रेड’मध्ये अजय देवगणने अमय पटनायक नावाचे पात्र साकारले आहे. अमय एक प्रामाणिक आयकर अधिकारी आहे. तो भ्रष्ट व गुंड राजकारणी रघुवीर सिंहच्या (सौरभ शुक्ला) विरोधात एक छापेमारी अभियान चालवतो. ‘रेड’ सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट जियो हॉटस्टारच्या टॉप १० सिनेमांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर दाक्षिणात्य स्टार मोहनलाल यांचा मल्याळम अॅक्शन-थ्रिलर ‘एल2 एम्पुरान’ आहे.
अभिनयाचं झालेलं कौतुक
‘रेड’ मध्ये फक्त अजय देवगणच नाही, तर नकारात्मक भूमिकेत असलेल्या सौरभ शुक्ला यांनीही दमदार अभिनय केला होता. दोघांच्याही अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली होती.
‘रेड’चे बजेट व कलेक्शन
‘रेड’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या निर्मितासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि भारतात या चित्रपटाने १०३.७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. जगभरात या चित्रपटाचं कलेक्शन १५४.१९ कोटी रुपये होतं. चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केलं होतं. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ७.४ रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, आता नुकताच ‘रेड’ सिनेमाचा दुसरा भाग ‘रेड २’ रिलीज झाला आहे, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘रेड २’ने जगभरात २०० कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे.