सत्य घटनेपासून प्रेरित असलेला ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. याचं हृदयस्पर्शी कथानक, सिनेमातील दमदार कलाकार, शिवराजचं दिग्दर्शन या सगळ्या गोष्टींचं मराठी कलाकारांसह प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हा सिनेमा आवर्जून पाहा अशी विनंती प्रेक्षकांना केली.

अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहेत. सर्वत्र कौतुक झालेला अन् प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट लवकरच सिनेप्रेमींना घरबसल्या पाहता येणार आहे. कधी अन् कुठे याबद्दल जाणून घेऊयात…

या कथेच्या केंद्रस्थानी तुकाराम (भरत जाधव) हा मध्यमवयीन सफाई कर्मचारी आहे, ज्यानं आपलं आयुष्य मुंबईचे रस्ते स्वच्छ करण्यात घालवलेलं असतं. नव्याने रूजू झालेले अधिकारी (आशुतोष गोवारीकर) तुकारामला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. यानंतरचा तुकाराम अन् त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळतो. ही गोष्ट सामान्य लोकांनी केलेल्या असामान्य धाडसाबद्दलची आहे आणि ते धाडस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं.

‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचा प्रीमियर ZEE5 वर २८ जूनला करण्यात येणार आहे. हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडतं. मराठी इंडस्ट्रीत कौतुकास्पद अभिप्राय मिळवत या सिनेमानं आयएमडीबीवर 8.8 चं जबरदस्त रेटिंग मिळवलं आहे. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या या भरघोस यशानंतर या सिनेमाचा डिजिटल प्रीमियर जूनच्या २८ तारखेला ZEE5 वर करण्यात येईल.

दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणाला, “थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5 वर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे याचा मला विशेष आनंद वाटतो. मला विश्वास आहे, की हा सिनेमा अनेकांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नवा अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आता थांबायचं नाय’ हा प्रेरणादायी सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल, तर २८ जून रोजी ZEE5 वर नक्की पाहा असं आवाहन प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीमने केलं आहे.