Seven Crime Drama Series To Watch : थ्रिलर, रहस्यमय, क्राइम आणि हॉरर अशा जॉनरच्या सीरिजबद्दल नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असते. या धाटणीच्या सीरिजना मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रतिसादही मिळतो, त्यामुळे जर तुम्हाला क्राइम ड्रामा पाहण्याची आवड असेल तर आम्ही तुम्हाला ७ क्राइम सीरिजची नावं सांगणार आहोत. कोणत्या आहेत या सीरिज घ्या जाणून…

Delhi Crime – ही अशी वेब सीरिज आहे, जी देशाला हादरवून टाकणाऱ्या सत्य घटनांवर आधारित आहे. पहिल्या सिझनमध्ये २०१२ मधील निर्भया प्रकरणाच्या तपासाची गोष्ट दाखवली आहे. दिल्ली पोलिसांनी प्रचंड दडपणखाली आणि लोकांचा रोष असतानाही न्याय मिळवण्यासाठी केलेला संघर्ष पाहायला मिळतो. दुसऱ्या सिझनमध्ये कच्चा बनियान टोळीच्या खुनांच्या मालिका दाखवल्या आहेत. या सीरिजचं वास्तववादी चित्रण आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे या सीरिजला भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय एमी (emmy) पुरस्कार (Best Drama Series) मिळाला. आता Delhi Crime चा तिसरा सिझन १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

House Of Secrets : The Burari Deaths – ही थरारक सीरिज २०१८ मधील बुराडी मृत्यू प्रकरणावर आधारित आहे, ज्यात दिल्लीतील एका कुटुंबातील ११ सदस्य रहस्यमय परिस्थितीत मृत अवस्थेत सापडले होते. या सीरिजमध्ये पत्रकार, तपास अधिकारी आणि नातेवाईकांच्या मुलाखतींमधून या दुर्दैवी घटनेमागचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ गुन्ह्यावर नाही, तर ही सीरिज श्रद्धा, मानसिक आरोग्य आणि कुटुंबातील दडपण या विषयांवरही प्रकाश टाकते. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Dancing On The Grave – ही एक खऱ्या गुन्ह्यावर आधारित सीरिज आहे, जी १९९० च्या दशकातील बेंगळुरूमधील श्रीमंत वारसदार शकेरेह खलीली यांच्या खुनाची गोष्ट सांगते. सुरुवातीला एका आकर्षक समाजसेविका आणि उच्चभ्रू स्त्रीची कहाणी वाटणारी ही गोष्ट हळूहळू फसवणूक, वेड आणि भयानक गुन्ह्याची थरारक गाथा बनते, ज्याने संपूर्ण देश हादरवला होता. ही सीरिज अमॅझॉन प्राइम व्हिडीओवर तुम्ही पाहू शकता.

Crime Stories: India Detectives – ही खऱ्या गुन्ह्यांवर आधारित सीरिज आहे, जी बंगळुरू पोलिसांच्या कामकाजावर आधारित आहे. या मालिकेत पोलिस खऱ्या खुनांच्या प्रकरणांची चौकशी करताना येणाऱ्या तणावपूर्ण क्षणांचे आणि भावनिक संघर्षाला कसे सामोरे जातात ते दिसते. गुन्ह्यांपलीकडे जाऊन ही सीरिज तपास अधिकाऱ्यांचे आणि पीडितांच्या कुटुंबांचे मानवी पैलू समोर आणते. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Manvat Murders – ही मराठी क्राइम थ्रिलर सीरिज आहे, जी रमाकांत एस. कुलकर्णी यांच्या Footprints on the Sand of Crime या आत्मकथनावर आधारित आहे. ही गोष्ट १९७० च्या दशकातील ग्रामीण महाराष्ट्रात मुली आणि महिलांच्या क्रूर खुनानंतर पसरलेल्या अंधश्रद्धा आणि काळ्या जादूचे सावट यावर आधारित आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी अधिकारी रमाकांत कुलकर्णी (अशुतोष गोवारीकर) यांना पाठवले जाते. मालिकेत गुन्हा, सामाजिक-आर्थिक वास्तव आणि पोलिस दलावर येणारा ताण या सगळ्यांचा मिलाफ आहे.

The Indrani Mukerjea Story: Buried Truth -ही सीरिज २०१५ मध्ये संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या शीना बोरा खून प्रकरणावर आधारित आहे. ही सीरिज इंद्राणी मुखर्जीवर लक्ष केंद्रित करते, जिच्याविरुद्ध खून, लपवाछपवी आणि कुटुंबातील गुपितं अशा धक्कादायक आरोपांची चर्चा झाली होती. ही सीरिज तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Indian Predator – ही क्राइम सीरिज भारतातील सर्वात भयावह आणि थरारक गुन्हेगारी प्रकरणांवर आधारित आहे. प्रत्येक भागात वेगळ्या गुन्हेगाराची कथा, त्याचे अपराध, तपास आणि समाजावर झालेला परिणाम दाखवला आहे. The Butcher of Delhi मध्ये चंद्रकांत झा या खुन्याची कथा आहे, ज्याने पोलिसांना छाटलेल्या मृतदेहांद्वारे आव्हान दिलं. Diary of a Serial Killer मध्ये राजा कोलंदरने केलेल्या १५ खुनांचा उलगडा केला आहे. Murder in a Courtroom मध्ये नागपूरच्या न्यायालयात महिलांनीच अक्कू यादवचा केलेला निर्दयी अंत दाखवला आहे. तर Beast of Bangalore मध्ये माजी पोलिस अधिकारी असलेला उमेश रेड्डी, जो पुढे सीरियल किलर होतो, हे दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उप्लब्ध आहे.