Dilip Prabhavalkar’s Dashavatar OTT Release : २०२५ या वर्षात आतापर्यंतच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘दशावतार’. ‘दशावतार’ या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना ‘दशावतार’चा हा खेळ आवडला. कोकणातल्या बाबुली मेस्त्रीची ही गोष्ट रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. महाराष्ट्र आणि जगभरात गाजलेल्या ‘दशावतार’चं सध्या सर्वच स्तरांतून कौतुक झालं.

प्रेक्षकांसह राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक दिग्गज कलाकारांना हा कोकणातला पारंपरिक ‘दशावतार’ आवडला. ‘कांतारा’चा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनंदेखील ‘दशावतार’बद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित या सिनेमात दिलीप प्रभावळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. वडील-मुलाच्या प्रेमळ नात्याबरोबरच कोकणातील पारंपरिक लोककलाही या सिनेमातून पाहायला मिळाली.

१२ सप्टेंबर रोजी आलेल्या ‘दशावतार’ या सिनेमानं महाराष्ट्र आणि जगभरात कोट्यवधींची कमाई केली. सिनेमातून मांडण्यात आलेला विषय अनेकांना भावला. त्यामुळेच ‘दशावतार’चा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत गर्दी केली होती. मात्र, तरीही काही कारणास्तव ज्यांना हा सिनेमा चित्रपटगृहांत बघता आला नाही. त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे आणि ती म्हणजे ‘दशावतार’ लवकरच ओटीटीवर दाखल होणार आहे. ‘दशावतार’ नक्की कोणत्या ओटीटी माध्यमावर आणि कधी प्रदर्शित होणार आहे? चला जाणून घेऊ…

दिलीप प्रभावळकरांचा ‘दशावतार’ सिनेमा १४ नोव्हेंबरपासून झी-5 या ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे. झी-5च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. “एक ८० वर्षांचा कलाकार ज्याच्या आयुष्याच्या रंगमंचावर उभा राहिला दशावतार. पाहायला विसरू नका मराठीतील भव्य-दिव्य सिनेमा ‘दशावतार’. १४ नोव्हेंबरपासून फक्त झी-5 वर”, असं म्हणत ‘दशावतार’च्या ओटीटी रिलीजची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमात दिलीप प्रभावळकरांसह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, आरती वडगबाळकर आणि काही इतर कलाकार मुख्य भूमिकांत होते. या सिनेमासह सर्व कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक झालं.