scorecardresearch

किंग खान शाहरुखच्या ‘पठाण’चा ओटीटीवर धुमाकूळ; चित्रपटातील डिलीट केलेले ‘ते’ सीन्स पाहून नेटकरी म्हणाले…

सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजमध्ये डिलिट केलेले सीन्स दिसणार असल्याची शक्यता वर्तवली होती

pathaan deleted scenes
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत याने वेगवेगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. प्रदर्शनाआधी हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला, पण त्यामुळे चित्रपटाचं फारसं नुकसान झालं नाही.

चित्रपटगृहात इतिहास रचल्यानंतर ‘पठाण’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाची सगळेच आतुरतेने वाट बघत होते. नुकताच ‘पठाण’ प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजमध्ये काही डिलिट केलेले सीन्सही दिसणार असल्याची शक्यता वर्तवली होती. ती शक्यता खरी ठरली आहे. ‘पठाण’ आणि शाहरुख खानच्या चाहत्यांनी याची पुष्टी केली आहे.

आणखी वाचा : कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ या राज्याने केला टॅक्स फ्री; दिग्दर्शिकेने ट्वीट करत दिली खुशखबर

‘पठाण’मध्ये शाहरुख खानचा पहिलाच टॉर्चर करतानाचा सीन वाढवला असल्याचं नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. याबरोबरच शाहरुखच्या आणखी एका एन्ट्री सीनला या ओटीटी व्हर्जनमध्ये सामील करण्यात आलं आहे. हे सीन्स चित्रपटगृहात दाखवले असते तर प्रेक्षकांनी चित्रपटगृह आणखी डोक्यावर घेतलं असतं असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर दीपिकाचासुद्धा चौकशीचा एक सीन यामध्ये दाखवण्यात आला आहे.

याबरोबरच चित्रपटातील नवे डायलॉग हे आणखीन प्रेक्षकांना भावले आहेत. नेटकऱ्यांनी या सीन्समधले काही स्क्रीनशॉट आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘पठाण’ने जगभरात १००० कोटीहून अधिक कमाई केली असून भारतात या चित्रपटाने ५११ कोटींपेक्षा जास्त कमाई करत ‘बाहुबली’सारख्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालणार हे मात्र नक्की आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:18 IST

संबंधित बातम्या