फुटबॉल विश्वातील दिग्गज ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगरानीत ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.

पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.

हेही वाचा>> पेलेंच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा; फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंतच्या ‘या’ खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

पेले यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक २०१६ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ‘पेले: बर्थ ऑफ अ लेजंड’ असं त्यांच्या बायोपिकचं नाव आहे. जेफ व मायकेल झिमब्लास्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

हेही वाचा>> Pele Passes Away: पेलेंनी खरोखरच युद्ध थांबवले होते का? जाणून घ्या काय घडलं होतं ५३ वर्षांपूर्वी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटफ्लिक्सने गेल्याच वर्षी पेले यांच्या जीवनावरील बायोपिक प्रदर्शित केला होता. ‘पेले’ असं त्या बायोपिकचं नाव असून फेब्रुवारी २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. पेले यांच्या बालपण, फुटबॉलमधील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा उलगडा या चित्रपटातून करण्यात आला आहे. पेले यांच्या फुटबॉल खेळाचे, त्यांच्या मुलाखतीचे फुटेजही या चित्रपटात वापरण्यात आले आहेत. बेन निकोल्स यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून नेटफ्लिक्सवर तो उपलब्ध आहे.