‘धडक’ फेम बॉलीवूड अभिनेता ईशान खट्टर नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत असतो. ‘धडक’मधील ईशान खट्टर व जान्हवी कपूर यांची लव्ह स्टोरी अनेकांना भावली होती. त्याशिवाय या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर दोघांच्याही करिअरला सुरुवात झाली आणि ईशान व जान्हवी विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच ७ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘प्यार आता है’ या गाण्यामध्ये ईशान अभिनेत्री तारा सुतारियासह मुख्य भूमिकेत झळकला होता. आता लवकरच ईशान आणखी एका नव्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईशान ‘द रॉयल’ या आगामी वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
‘द रॉयल’ या वेब सीरिजमध्ये ईशानसह अभिनेत्री भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सीरिजचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. ‘एक जिद्दी राजकुमार भेटणार गर्ल बॉस आमकुमारीला गोंधळ की प्रेमकहाणी?’ असं हटके कॅप्शन या वेब सीरिजच्या पोस्टखाली लिहिलेली पाहायला मिळत आहे. तर समोर आलेल्या पोस्टरखाली प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही दिसत आहेत. सोशल मीडियावर लोकांनी, “या सीरिजमध्ये नौराला पाहण्यासाठी उत्सुक आहे”; तर काहींनी “ईशानला नवीन भूमिकेत पाहण्याची उत्सुक्तता आहे” अशा कमेंट्स केलेल्या पाहायला मिळतायत. तर पोस्टर समोर प्रदर्शित होण्यापूर्वी या सीरिजचा टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.
या सीरिजमध्ये भूमी पेडणेकर लेडी बॉसच्या भूमिकेत पाहायला मिळेल आणि ईशान हा एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भूमी व ईशान या सीरिजमध्ये पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे आता ही फ्रेश जोडी या सीरिजमध्ये नेमकं काय करणार? आणि त्यांच्या लव्ह स्टोरीत नक्की काय वेगळेपण असेल? हे पाहणं रंजक ठरेल.
ईशान खट्टर व भूमी पेडणेकर यांच्यासह या सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान, साक्षी तन्वर, चंकी पांडे, नौरा फतेही, मिलिंद सोमण यांसारखे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. येत्या ९ मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दरम्यान, ‘द रॉयल’बरोबरच ईशान खट्टर लवकरच ‘होमबाऊंड’ या आगामी चित्रपटाचा भाग असणार आहे. त्यामध्ये त्याच्यासह जान्हवी मुख्य भूमिकेत आहे. ‘धडक’नंतर आता ईशान व जान्हवी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत.तर ‘धडक’नंतर ईशान तब्बल सात वर्षांनी धर्मा प्रॉडक्शन व करण जोहरसह काम करत आहे. तर अभिनेत्री भूमी पेडणेकरही नुकतीच ‘मेरे पती की बीवी’ या चित्रपटात झळकली होती. त्यामध्ये भूमी पेडणेकर, अर्जून कपूर, रकुल प्रीत सिंग हे कलाकार होते.