या वीकेंडला तुम्ही फ्री असाल आणि ओटीटीवर काहीतरी चांगलं पाहावं असा विचार करत असाल तर हा सिनेमा तुम्ही पाहू शकता. अॅक्शन, ड्रामा, भावनिक कथा आणि थरारक क्लायमॅक्स असं सगळं या सिनेमात आहे. २ तास २० मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे. हा चित्रपट जसजसा पुढ सरकतो, तसतसे त्यातील ट्विस्ट तुम्हाला चक्रावून सोडतील.

डीएनए असं या चित्रपटाचं नाव आहे. यात अथर्व मुरली व निमिषा सजयन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करणाऱ्या दोन लोकांवर हा चित्रपट बेतला आहे. दिव्याला मानसिक समस्या असतात, तर आनंद आपलं पहिलं प्रेम न मिळाल्याने दुःखी असतो. तो रिहॅब सेंटरमधून परत येतो आणि त्याचे आई-वडील त्याचं लग्न दिव्याशी ठरवतात. आनंद व दिव्याच्या लग्नाच्या दिवशी दिव्या वेडी असल्याचं आनंदच्या मित्राला समजतं. तो लग्न रोखण्याचा प्रयत्न करतो, पण सत्य माहीत असूनही आनंद तिच्याशी लग्न करतो.

लग्नानंतर दोघेही खूप आनंदी असतात आणि मग एके दिवशी त्यांच्या घरात चिमुकल्या सदस्याचं आगमन होतं, पण त्या दिवशी सगळं बदलतं. दिव्या दावा करते की तिचे नवजात बाळ बदलले आहे. सुरुवातीला पती आनंदला वाटतं की त्याच्या पत्नीला भास होत आहेत, पण हळूहळू त्याच्यासमोर जे सत्य येतं, त्यामुळे तो हादरतो.

‘डीएनए’ सिनेमाची कथा जसजशी पुढे सरकते त्यात ज्योतिष, ग्रह-नक्षत्र, मानसिक संघर्ष आणि मुलांच्या तस्करीचे एक आंतरराष्ट्रीय सिंडिकेट अशा गोष्टी समोर येतात. सामाजिक पूर्वग्रह आणि संकुचित मानसिकता कशा पद्धतीने एका आईच्या मातृत्वावर प्रश्न उपस्थित करते, ते या सिनेमात पाहायला मिळतं.

पाहा ट्रेलर –

‘डीएनए’ चित्रपटाचे पार्श्वसंगीत जबरदस्त आहे. ते या चित्रपटाचे थ्रिल वाढवते. चित्रपटातील दृश्ये खूप प्रभावीपणे शूट करण्यात आली आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स डोकं चक्रावणारा आहे. चित्रपटाला बूक माय शो वर ८.९ रेटिंग मिळाले आहे. तर आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. नेल्सन व्येंकटन दिग्दर्शित हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. डीएनए चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम व तेलुगू भाषेत जिओहॉटस्टारवर उपलब्ध आहे.