अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. सोनाली ही लवकरच ‘स्कूल ऑफ लाईज’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ‘स्कूल ऑफ लाईज’ बोर्डिंग स्कूल या वेबसीरिजमध्ये किशोरवयीन मुलांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. या निमित्ताने तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले.
सोनाली कुलकर्णी ही ‘स्कूल ऑफ लाईज’मध्ये आईची भूमिका साकारत आहे. यावेळी तिने तिच्या आईवडिलांबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केले. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “प्रत्येक कुटुंबामध्ये गुंतागूंतीचे नाते असते. आई-वडील कितीही चांगले वागले तरी मुलांना वाटते की, ते त्यांच्याशी योग्यपणे वागत नाहीत. पण शेवटी माझ्या जीवनातील या टप्प्यावर त्यांनी माझ्यासाठी सर्वकाही चांगले केले हे समजले आहे. त्यांचे माझ्यावर आणि माझ्या भावंडांवरही तितकेच प्रेम होते.”
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
“मी स्वत: आई झाल्यावर मला माझ्या आई-वडिलांची आव्हाने समजली. ते प्रोफेशनल पालक नव्हते. त्यांच्यात काही प्रमाणात भोळेपणा होता. एक-दोन नाही तर तीन मुलांचे संगोपन त्यांनी केले. त्यात त्यांना नेहमीच काही-ना-काही अडचणी आल्या. आता मला माझ्या एकुलती एक मुलीचे संगोपन करताना देखील कसरत करावी लागते. मी माझ्या मुलीसाठी सर्व काही करते. पण जेव्हा एकच मूल असते, तेव्हा कुटुंबांमधील मुलांना कोणत्या स्थितीमधून जावे लागते याची मला चांगलीच कल्पना आहे.”
“मी लहान असताना सतत माझ्या लुक्सवरून आईबरोबर भांडायचे. मी तिला अनेकदा विचारायचे की मी सुंदर का दिसत नाही, मी गोरी आणि उंच का नाही? माझे भाऊ खूप देखणे आहेत. त्यामुळे मी देखील सुंदर असावे अशी माझी फार इच्छा होती. पण त्यावेळी मला माझी आई एकच उत्तर द्यायची आणि सांगायची, माझ्यासाठी तू कायमच सुंदर असशील आणि आहेस. तू मला खूप आवडते”, अशी आठवण तिने सांगितली आहे.
आणखी वाचा : “पिकलेल्या आंब्यासारखी…” मराठी अभिनेत्रीने संभाजी भिडेंसह शेअर केला फोटो, पोस्ट चर्चेत
दरम्यान ‘स्कूल ऑफ लाईज’ या थ्रिलर सिरीजमध्ये निमरत कौर, आमिर बाशिर, गीतिका विद्या ओहल्यान, सोनाली कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. वास्तविक घटनांमधून प्रेरित आणि बीबीसी स्टुडिओजद्वारे निर्मित ‘स्कूल ऑफ लाईज’ची निर्मिती ईशानी बॅनर्जी आणि अविनाश अरूण धावरे यांनी केली आहे. तर याचे दिगदर्शन अविनाश अरूण धावरे यांनी केले आहे. येत्या २ जून २०२३ पासून डिस्नी+ हॉटस्टारवर या वेबसिरीजचे स्ट्रिमिंग सुरु होणार आहे.
मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sonali kulkarni talk about her parents and childhood memories during school of lies webseries nrp