संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची खूप चर्चा झाली. १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं. यात संजीदा शेख हिने वहीदा नावाचं पात्र साकारलं आहे, संजीदाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. आता संजीदाने या सीरिजमधील तिच्या मुजरा सीनबद्दल खुलासा केला आहे. मासिक पाळीच्या पहिल्याच दिवशी हा सीन शूट केल्याचं संजीदाने सांगितलं.
‘हॉटरफ्लाय’शी बोलताना संजीदा म्हणाली, “मी सेटवर माझ्या मासिक पाळीबद्दल बोलत असते. मी पाळीबद्दल दिग्दर्शकालाही सांगते. जेव्हा माझ्या आईला मासिक पाळी आली होती, तेव्हा तिने सर्वात आधी तिच्या वडिलांना सांगितलं होतं. माझी आई जर त्या काळी तिच्या वडिलांना पाळीबद्दल सांगू शकत असेल तर माझ्यासाठी दिग्दर्शक, निर्माता किंवा माझ्या सहकलाकाराला सांगणं मोठी गोष्ट नाही. मला वाटतं की ही अतिशय सामान्य गोष्ट आहे.”
मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी मुजरा शूट केला
संजीदा पुढे म्हणाली, “माझ्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी मी ‘हीरामंडी’साठी माझा मुजरा शूट केला. पाळीच्या दुसऱ्या दिवशी अनकंफर्टेबल वाटतं, चिडचिड होते आणि अस्वस्थ वाटतं. पण, मी जे काही करत होते त्यात मी इतके मग्न होते की मी सगळा त्रास विसरले. पण पाळी सुरू असताना ते लवकर पॅकअप करायला लावून मला घरी पाठवायचे.”
“मी त्यांना सांगितलं की मला अनकंफर्टेबल आहे, त्यामुळे आज आराम केला तर दुसऱ्या दिवशी बरे वाटेल. तर हे सगळं असं आहे. आपण स्वत: ला व्यक्त करणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्यांना सांगितलं नाही, तर त्यांना वाटेल की तुम्ही खूप चिडचिड करता. त्यामुळे तुम्ही चिडचिडे का आहात हे आधी सांगणं अधिक योग्य ठरेल”, असं मत संजीदाने व्यक्त केलं.
आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…
१० मिनिटांची मीटिंग अन् ‘हीरामंडी’मध्ये मिळालं काम
संजीदा म्हणाली, “ती १० मिनिटांची छोटीशी मीटिंग होती आणि सर मला १०-१५ वर्षांपूर्वी भेटले होते, मला वाटलं की त्यांना मीटिंगबद्दल काही आठवत नसेल. पण त्यांना सगळं लक्षात होतं. ते म्हणाले की तू जास्त चांगली, फ्रेश आणि आनंदी दिसत आहेस. आणि मग या भेटीबद्दल कोणालाही सांगू नकोस असं त्यांनी सांगितलं.”
‘हीरामंडी’ सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख व शर्मिन सेगल या अभिनेत्री तसेच फरदीन खान, ताहा शाह, शेखर सुमन व अध्ययन सुमन हे अभिनेते होते.
