The Bads Of Bollywood Trailer release: जितकी कलाकारांची चर्चा होते, तितकीच त्यांच्या मुलांचीदेखील चर्चा होते. कलाकारांची मुले कोणत्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतात, याची प्रेक्षकांना उत्सुकता असते.

अनेक वर्षांपासून अभिनयाच्या माध्यमातून बॉलीवूडच्या किंग खानने म्हणजेच शाहरुख खानने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता त्याचा मोठा मुलगा आर्यन खाननेदेखील मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले आहे.

शाहरुखच्या मुलाने जरी मनोरंजन सृष्टीत पहिले पाऊल टाकले असले तरी वडिलांपेक्षा त्याने वेगळा मार्ग निवडला आहे. त्याने अभिनयातून नाही, तर दिग्दर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड'(The Bads Of Bollywood) हा शो प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी लाँच सोहळा पार पडला. त्यामध्ये शाहरुख व गौरी खानही दिसले. तसेच, बॉलीवूडमधील काही कलाकार आर्यन खानच्या या लाँच सोहळ्यात हजर होते. या सोहळ्यात शाहरुख ज्या पद्धतीने त्याच्या मुलाला पाठिंबा देत होता, ते पाहून अनेकजण भारावून गेले होते.

तसेच, आर्यनचा आवाज, त्याची स्टाइल हे शाहरुख सारखेच असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तर रितेश देशमुखसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्यन खानला शुभेच्छा दिल्या होत्या. आता बॅड्स ऑफ बॉलीवूडचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बॉलीवूडमध्ये करिअर करण्याची, मोठा अभिनेता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांची गोष्ट पाहायला मिळत आहेत. आस्मान या तरुणाला चित्रपटसृष्टीत आल्यानंतर समजते की स्वप्नांची खूप मोठी किंमत मोजायला लागणार आहे. बॉलीवूडची दुसरी बाजू या शोमध्ये पाहायला मिळणार असल्याचे, ट्रेलरमध्ये दिसत आहे.

या ट्रेलरमध्ये बॉबी देओल, मोना सिंग, लक्ष्य, राघव जुयाल या कलाकारांसह शाहरुख खान, एसएस राजामौली, बादशाह, आमिर खान या कलाकारांची झलकदेखील दिसली आहे. तसेच, या शोमध्ये रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, करण जोहर, सारा अली खान, राजकुमार राव, दिशा पटानी यांची झलकदेखील पाहायला मिळणार आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ १८ सप्टेंबर २०२५ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.