Pallavi Joshi Reacted On Kashmir Tourism : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल, मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. ‘मिनी स्वित्झर्लंड’ अशी ओळख असलेल्या दक्षिण काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर अनेक पर्यटकांनी जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवली आहे. काश्मीर हा परिसर पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पण पहलगाममधील हल्ल्यानंतर इथल्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पहलगाममधील हल्ल्यानंतर अनेकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली असली, तरी मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी पहगाममध्ये जाऊन तिथल्या लोकांची भेट घेतली. तिथल्या स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटकांनी आवर्जून येथे यावे असे आवाहनही त्यांनी केलं. अशातच आता पल्लवी जोशी यांनी काश्मीरमधील पर्यटनावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. पल्लवी यांनी नुकताच न्यूज १८ शी संवाद साधला. या संवादात त्यांना टेररिझमला टूरिझमने उत्तर शक्य आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देत पल्लवी यांनी असं म्हटलं की, “तिकडे जाऊन कोण टूरिझम (पर्यटन) करणार आहे? जे लोक आवाहन करत आहेत, त्यांनी तिकडे जावं आणि आवाहन करावं. पण मी तिकडे जाण्यासाठी कोणाला सांगणार नाही. तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे. मी कशाला कोणाला तिकडे जा असं सांगेन. भारतात आणखी दुसरी पर्यटन स्थळं नाहीत का? जोवर पूर्णपणे या गोष्टी जात नाहीत. तोवर तुम्ही तिकडे का जायचं? हे म्हणजे वाघाच्या तोंडात हात घातल्यासारखं आहे. तुम्हाला अशी विष परीक्षा का घ्यायची आहे?”
यानंतर त्यांनी असं म्हटलं की, “काश्मीरच्या लोकांचं जीवन हे पर्यटनावरच आहे. मला त्यांच्याबद्दल वाईटच वाटतं आहे. ज्यांच्या मनात असं काही नव्हतं. त्यांच्याबद्दल हे होणं अपेक्षित नाही. पण ज्या टुर्स आता तिकडे नेण्यात येत आहे. त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं जात आहेत किंवा जे कलाकार आता तिकडे जात आहेत. त्यांच्याबरोबर सुद्धा सुरक्षा आहेत. जे राजकीय पक्षाचे नेते तिकडे जात आहेत. ते त्यांच्याबरोबर वाय आणि झेड प्लस सुरक्षा घेऊन जात आहेत. पण पर्यटक सुरक्षा घेऊन जात नाहीत. त्यांच्या सुरक्षेचं काय?”
यापुढे पल्लवी यांनी असंही म्हटलं की, “तुम्ही प्रमोशनल टुर्स आयोजित करु शकता. पण एखादा माणूस सुट्टीसाठी तिकडे जाणार असेल तर तो आपल्या बायको-मुलाला घेऊन जाईल का? काश्मीरला जाण्याबद्दल आता कोणाच्याच मनात विचार येणार नाही आणि जरी आला तरी माझं त्याला हे म्हणणं असेल की, तू काय वेडा आहेस का?”