बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट अखेर आज (२५ जानेवारी) प्रदर्शित होत आहे. शाहरुख खानबरोबर या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘पठाण’ चित्रपटाचं बेशरम गाणं प्रदर्शित झाल्यावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह काही भाजपा नेत्यांनी यावर आक्षेप घेतले होते. हिंदुत्ववादी संघटनांकडून अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीसह गाण्यातील काही वाक्यांवरही आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपानंतर ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने चित्रपट निर्मात्यांना काही बदल सुचवले. या बदलांनंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आता ‘पठाण’ चित्रपटाला विरोध करणार नसल्याचं म्हटलं आहे.
“सध्या तरी विश्व हिंदू परिषद पठाण चित्रपटला विरोध करणार नाही. आमचे पूर्वीचे आक्षेप लक्षात घेऊन चित्रपटात केलेले बदल योग्य आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला काही आक्षेपार्ह वाटले तर आम्ही चित्रपटाला विरोध करण्याचा पुनर्विचार करू.” असे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी सांगितले आहे.
‘बेशरम रंग’ गाण्यामुळे पठाण बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकला होता. परंतु, याचा चित्रपटावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने केली आहे. तसेच देशभरात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा दिला. देशात अनेक ठिकाणी या चित्रपटाच्याविरोधात पोस्टर-बॅनर फाडण्यात आले, तोडफोड करण्यात आली होती.
सांगलीत शाहरुखच्या चाहत्याने ‘पठाण’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे. तर बीड जिल्ह्यात ‘पठाण’ चित्रपटासाठी ४०० हून अधिक स्क्रीनचं बुकिंग करण्यात आलं आहे. अमरावतीतील तरुणांनी ‘पठाण’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.औरंगाबादमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी ‘पठाण’ चित्रपटातील त्याच्या लूकचं ५० फूटचं पोस्टर लावणार असल्याचं सांगितलं आहे.
‘पठाण’ चित्रपटात नेमके काय बदल?-
हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) ‘बेशरम रंग’ या गाण्यातील काही दृश्ये काढण्यास सांगितले. या चित्रपटात एकूण १० पेक्षा जास्त ठिकाणी ‘कट’ सुचवण्यात आले. असं असलं तरी हिंदुत्ववादी संघटनांनी बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या ज्या बिकिनीवर आक्षेप घेतला होता तो मात्र मान्य केला नाही. बोर्डाने दीपिकाची बहुचर्चित भगवी बिकिनी चित्रपटाचा भाग म्हणून कायम ठेवली.
याशिवाय चित्रपटातील ‘लंगडे लुल्ले’ या शब्दप्रयोगाऐवजी ‘टुटे फुटे’ असा शब्दप्रयोग बदलण्यात आला. अशोक चक्र ऐवजी वीर पुरस्कार, केजीबी (KGB) ऐवजी एसबीयू (SBU) आणि श्रीमती भारतमाता ऐवजी हमारी भारतमाता असे बदलही सुचवण्यात आले.