राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या वास्तववादी चित्रपटाच्या प्रदर्शनाने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली. यापूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपल्या आगामी वेबसिरीज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. आता नव्या रूपात भेटीला आलेल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजिना उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘म… मानाचा, म… महानतेचा, म… मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची झलक पाहायला मिळतेय.

मराठी मनाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, असे समीर सामंत यांचे गीतलेखन असून या गाण्याला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे, योगिता गोडबोले, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पुष्कर श्रोत्री यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यात अक्षय बर्दापूरकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, शरद केळकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी अशा अनेक कलाकारांचा सहभाग आहे.

या गौरव गीताविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी आमचा सर्वोतोपरी प्रयत्न असेल. लवकरच नवनवीन कन्टेंट घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येऊ आणि आम्हाला आशा आहे हा मनोरंजनाचा खजिना तुम्हाला नक्कीच आवडेल.