‘झी मराठी’ वाहिनीवर बऱ्याच काळानंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका २५ सप्टेंबर २०१७ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. संभाजीराजांचे रुप, त्यांचा इतिहास मालिकेत कसा दाखवला जाईल, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात पिंगा घालू लागले होते. पण जेव्हा छोट्या पडद्यावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हा लोकांनी अक्षरश: त्याला डोक्यावर उचलून घेतलं. मात्र आता ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेचा शेवट नुकताच चित्रीत करण्यात आला. या मालिकेने टीआरपीच्या यादीतही टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने ५०० एपिसोड पूर्ण केले होते.

इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि आजच्या तरुणाईला संभाजींची ओळख करून देणं याचं भान ठेवत ही मालिका केली असल्याचं अमोल कोल्हे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. या मालिकेची जागा कुठली मालिका घेणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular historical series swarajyarakshak sambhaji to go off air soon ssv
First published on: 03-02-2020 at 11:15 IST