बॉलीवू़डनंतर हॉलीवूडमध्ये हंगामा करणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा एका फोटोशूटमुळे पुन्हा अडचणीत आली आहे. प्रियांका चोप्रा कॉन्ड नास्ट ट्रॅव्हलर मासिकात झळकली आहे. या मासिकातील फोटोमुळे प्रियांका सध्या चर्चेत आली आहे. मासिकात छापून आलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा टि शर्ट परिधान केल्याचे दिसते. या टी-शर्टवर लिहलेल्या रेफ्यूजी, इमिग्रेशन, आउटसाइडर, ट्रॅव्हलर या चार शब्दांमुळे चाहत्यांनी प्रियांकाच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. या चार शब्दांमधील तीन शब्दांना लाल रंगाने खोडले असून ट्रॅव्हलर या शब्दाला तसेच ठेवण्यात आले आहे. या चार शब्दांचा अर्थ लावला तर पहिला शब्द निर्वासित, दुसरा शब्द अप्रवासी आणि तिसरा शब्द बाहेरुन आलेला असा होतो. तर छेडछाड न करता ट्रॅव्हलर हा शब्द तसाच ठेवण्यात आला असून, त्याचा अर्थ इकडे तिकडे भटकत राहणारा अर्थात प्रवासी असा होता.
या चार शब्दांचा नेटीझन्स आपापल्या परिने अर्थ लावत असून प्रियांकाला यातून काय संदेश द्यायचा आहे, याबद्दल विचारणा करत आहेत. निर्वासितांना, अप्रवाशांना आणि बाहेरुन आलेल्यांवर बंदी घालण्याचा संदेश प्रियांकाला द्यायचा आहे का? अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटत आहेत. काहींनी प्रियांका चुकीचा संदेश देत असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी ‘मॅक्सिम इंडिया’ या मासिकासाठी केलेल्या फोटोशूटमुळे प्रियांका चर्चेत आली होती. मॅक्सिम इंडिया मासिकातील फोटो प्रियांकाने ट्विटरवरुन शेअर केला होता. यावेळी देखील तिच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करुन काहींनी या फोटोतील तिचा काखेचा भाग फोटोशॉप केल्याचा आक्षेप काही नेटीझन्सनी केला होता. या फोटोवर उमटलेल्या प्रतिक्रियांनी प्रियांका चांगलीच भडकली होती. तिने यासंदर्भात सोशल मिडियाच्या आधारे टीकाकारांना उत्तर दिले होते. मात्र सध्याच्या फोटोवरुन उठलेल्या वादळावर प्रियांकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेतील क्वांटिको मालिकेच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. अमेरिकेतील लोकप्रिय मालिका असणाऱ्या क्वांटिकोमुळे प्रियांकाने हॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. या मालिकेतील दुसऱ्या भागात प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2016 रोजी प्रकाशित
‘त्या’ चार शब्दांमुळे प्रियांकावर नेटिझन्सची टीका
टी-शर्टवर लिहलेल्या चार शब्दांमुळे चाहत्यांनी प्रियांकाच्या सौंदर्याकडे केले दुर्लक्ष
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-10-2016 at 16:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra draws flak on social media for this message on a t shirt