निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

केरळमधील ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना बळजबरीने धर्मांतरित करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आलं आहे, असा दावा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातून केला आहे. चित्रपटकर्त्याच्या या दाव्यानंतर केरळमधील ‘मुस्लीम युथ लीग’ या संघटनेनं संबंधित दावे सिद्ध करणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. ‘मुस्लीम युथ लीग’ने याबाबत एक पोस्टर जारी केलं आहे.

हेही वाचा- ३२ हजार महिलांचं धर्मांतर केल्याचा दावा, ‘द केरळ स्टोरी’बद्दल शशी थरूर यांचं खुलं आव्हान; म्हणाले, “४ मेपर्यंत पुरावे द्या अन्…”

संबंधित पोस्टरमध्ये मुस्लीम युथ लीगने म्हटलं की, ‘केरळमधील ३२००० महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये घेऊन जा.’ यामध्ये ‘नॉट अ केरळ स्टोरी’ असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, त्यांनी ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट केरळमधील सुमारे ३२००० बेपत्ता महिलांची कथा आहे, ज्यांचं धर्मांतर करण्यात आलं, त्यांना कट्टरपंथी बनवलं गेलं आणि भारत व जगभरातील दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा वापर करण्यात आला. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावाही चित्रपटकर्त्यांनी केला आहे.