मानसी जोशी
जगभरात करोनामुळे हाहाकार माजवला असताना त्याचे पडसाद मनोरंजनक्षेत्रावरही उमटले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नाटय़ आणि चित्रपटगृहे बंद आणि मालिका-चित्रपटांचे चित्रीकरणही रद्द झाल्याने हातावर पोट असलेल्या पडद्यामागील कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नोकरीसारखे दर महिन्याला मिळणाऱ्या मानधनाची शाश्वती नसल्याने रोजचा घरखर्च कसा भागवायचा ही चिंताही त्यांना सतावते आहे. जगभर हजारोंचे प्राण घेणाऱ्या करोना नामक विषाणूने आता नाटक, चित्रपट मालिकेत पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचीच मीठ भाकरी हिरावून घेतली आहे. या बॅकस्टेज कलाकारांच्या समस्यांचा घेतलेला आढावा
चित्रपट आणि मालिका हा मनोरंजनाचा एक अविभाज्य भाग आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमात पडद्यावरील कलाकार दिग्दर्शकांसोबतच पडद्यामागील कलाकारांचेही योगदान महत्वाचे असते. एक चित्रपट, मालिका आणि नाटक प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी काम करणारे स्पॉटबॉय, लाईटमन, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यांचे हातही झटत असतात. चित्रपट, नाटक, मालिका यशस्वी झाल्यावर कलाकार-दिग्दर्शकांचे कौतूक होते आणि या पडद्यामागच्या कलाकारांचे काम झाकोळले जाते. नोकरीसारखे दर महिन्याला येणारे सुरक्षित उत्पन्नही नसल्याने त्यांना कामाची शाश्वती नसते. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नाटय़गृह चित्रपटगृहे सध्या बंद आहेत. तर मालिका-चित्रपटाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. हातावर पोट असलेल्या या रंगमंच कलाकारांना पुढील दिवस कसे काढायचे ही समस्या भेडसावते आहे. यावर रंगकर्मी संघटना, मराठी नाटय़निर्माता संघ, अखिल भारतीय मराठी नाटय़परिषद तर हिंदीत निर्माता संघ, इम्पा, एफडब्लयूआयसीई यासारख्या संघटना पुढे सरसावल्या आहेत. करोनामुळे भाविष्यातील परिणाम विचारात घेऊन बहुतांश कलाकारांनी गावचा रस्ता धरला आहे. मात्र, ही मदत आता त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने संघटनांच्या कार्यालयात तशीच पडून आहे.
रोजचे मानधन प्रणाली
मराठी- हिंदी नाटक, चित्रपट तसेच मालिकांसाठी काम करणाऱ्या लाईटमन, नेपथ्य, स्पॉटबॉय, यांचे मानधन ‘पर डे’ म्हणजेच दर दिवसाला दिले जाते. नाटकाचे प्रयोग, अथवा मालिकेचे त्या दिवसाचे चित्रीकरण संपल्यावर या कलाकारांना ठरलेल्यानुसार मानधन देण्यात येते. मालिका आणि नाटकाच्या बजेट आणि कामाच्या स्वरुपानुसार या मानधनात बदल होतात. डोअरकीपर, तिकीटविक्री करणारे कर्मचारी, स्पॉटबॉय यांना अंदाजे पाचशे ते सहाशे रुपये मानधन दिवसाला दिले जातात. दर दिवसाला पैसे देण्याची जबाबदारी निर्माता आणि व्यवस्थापकाची असते.
‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘डॉक्टर डॉन’, ‘कुलवधू’, ‘कळत नकळत’, ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’ या मालिकेसाठी रंगभूषेचे काम पाहणारे कमलेश परब यांनी पडद्यामागील कलाकारांच्या समस्या मांडल्या. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या रंगमंच कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठकला आहे. आतापर्यंत मी दहा ते बारा मालिका चित्रपटांसाठी रंगभूषेचे काम केले आहे. कला क्षेत्रात मालिकेच्या बजेट आणि कामानुसार कलाकारांचे दिवसाचे मानधन ठरवले जाते. १९ मार्चपर्यंत जेवढय़ा मालिकेचे चित्रीकरण झाले आहे. संचारबंदीमुळे पुन्हा मालिका कधी सुरु होईल हे माहिती नाही. नोकरीसारखे सुरक्षित आर्थिक उत्पन्न नसल्याने उरलेले दिवस बचत, गुंतवणूकीतून साठवलेल्या पैशात काढावे लागत असल्याचे ते सांगतात.
नाटक आणि चित्रपटासाठी बहुतांशी कलाकार हे कोकण, पुणे, सातारा, सांगली, येथून तर जास्त बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातून काम करण्यासाठी येतात. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही कलाकारांनी गावाची वाट धरली. तर काही गावाला जायच्या तयारीत असले तरीही जायचे सर्व मार्ग बंद झाल्याने मुंबईतच अडकून पडले आहेत. याबद्दल नाटकाच्या नेपथ्य आणि समन्वयाची धुरा सांभाळणारे प्रकाश परब सांगतात की, ‘१५ मार्चला शनिवार-रविवारी राज्यभर अठरा नाटकांचे प्रयोग होते. नाटय़गृहच बंद असल्याने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. रंगमंच कलाकाराचे रोजंदारीवर काम असल्याने त्यांना मिळणारे उत्पन्नही तुटपुंजे असते. यावर उपाय म्हणून रंगमंच कलाकार संघटनेकडून सर्व पडद्यामागील कलाकारांना दोन हजार रुपयांची मदत करण्यात आली. संचारबंदी १५ एप्रिलपर्यंत वाढवल्याने पुन्हा नाटकाचे प्रयोग कधी सुरु होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने मी गावाला जाण्याच्या तयारीत होतो. मात्र, संचारबंदीमुळे आता गावालाही जाऊ शकत नाही. कोकणात कणकवलीजवळ वैभववाडी येथे आमचे गाव आहे. अरुणा पाटबंधारे प्रकल्पातर्ंगत गाव धरणाच्या पाण्याखाली गेले होते. नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने मला गावात जाणे गरजेचे होते. मात्र, कोकणात जाणाऱ्या बस, ट्रेन बंद असल्याने घरी थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोकणात माझे कुटुंबिय झोपडीत राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवडी येथे प्रकाश परब यांचे गोदाम असून तेथे सहकलाकार अडकून पडले होते. एकाला विरार तर दुसऱ्याला दिव्याला जायचे होते. आज रंगमंच कलाकारांकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली असल्याची माहिती मिळाली. बिस्कीट, अन्नधान्य, भाज्या, सुका खाऊ अशा गोष्टींची मदत त्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी मराठी नाटय़निर्माता संघ, रंगमंच कलाकार यासारख्या नाटकासाठी काम करणाऱ्या संघटना या पडद्यामागील कलाकारांना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. प्रशांत दामले, अशोक हांडे यांनी आपल्या कलाकारांना मदत दिली आहे. या संघटनांकडे चित्रपटसृष्टीतून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे असा मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, कलाकार गावाला गेले असल्याने ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कशी हा मोठा प्रश्न त्यांना सतावतो आहे. याबद्दल रंगमंच कामगार संघटनेचे खनिजदार अभिलाश सरपडवळ यांनी सांगितले की, ‘मराठीतील निर्माते, दिग्दर्शकांकडून मदत संघटनेच्या कार्यालयात पडून आहे. मात्र, करोनामुळे पडद्यामागील कलाकार कोकण, सातारा, सांगली आणि पुणे या ठिकाणी गेल्याने एवढय़ा लांब मदत पोहोचवायची कशी हा मोठा प्रश्न आहे. ते कलाकार, कर्जत, वसई विरार, डहाणू पालघर येथे राहतात त्यांना कसे तरी करून मदत पोहोचवली जात आहे. लांबवर राहणाऱ्या रंगमंच कलाकारांच्या मदतीसाठी राज्य प्रशासन आणि पोलीसांशी बोलणे सुरु असल्याचे सरपडवळ सांगतात.
एफडब्लयआयसीई संघटनेतर्फे २२ मार्चपासून गोरेगाव येथील फिल्मीस्तान स्टुडिओत रंगमंच कलाकारांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येणार होती. मात्र, त्याच दिवशी जनता क र्फ्यू असल्याने तो उपक्रम रद्द करण्यात आला. तसेच मदत स्विकारण्यास कोणीच फिरकले नसल्याने बऱ्याच वस्तू संघटनेच्या कार्यालयात पडून असल्याची माहिती एफडब्लयूआयसीईचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी दिली. हिंदीत अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यापैकी सलमान खान पन्नास हजार रुपयाचंी मदत करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्युनियर आर्टिस्ट संघटनेचे अध्यक्ष ईर्दीश खान राजा यांनी करोनामुळे सध्या मुंबईतील पाच हजार ज्युनियर आर्टिस्ट घरीच बसले असल्याची माहिती दिली.
चित्रपटगृहांची स्थिती समाधानकारक
चित्रपटगृहेही पंधरा तारखेपासून बंद असल्याने त्या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, मार्च महिन्याचे मानधन त्यांना देण्यात आले आहे. ठाण्यातील वंदना चित्रपटगृहाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले भरत मास्टर यांनी सांगितले की, आमच्या चित्रपटगृहात अठरा कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या करोनामुळे दोन ते तीनच कर्मचारी कामावर आहेत. करोनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा अंदाज असल्याने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने आधीच ठराविक रक्कम देऊ केली असल्याचे त्यांनी सांगितले.