राज ठाकरे १९९६ मध्ये शिवसेनेच्या उद्योग सेनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने मुंबईत जगप्रसिद्ध दिवंगत डान्सर मायकल जॅक्सनच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाच्या काळात झालेला हा भव्य कार्यक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. नुकत्याच दिलेल्या ‘बोलभिडू’च्या मुलाखतीत राज ठाकरेंनी याबाबत भाष्य केलं आहे.

१९९६ च्या काळात मायकल जॅक्सनला भारतात आणून एवढा मोठा कार्यक्रम करायचा हा विचार कुठून आला? याबाबत सांगताना राज ठाकरे म्हणाले, “मायकल जॅक्सनचा मी खूप मोठा फॅन आजही आहे. तो माणूस आज नसला तरीही मी त्याचा खूप मोठा, जबरदस्त चाहता आहे. मला असं नेहमी वाटायचं की, या माणसाला भारतात आणलं पाहिजे. हे सगळे विचार डोक्यात सुरू असतानाच एके दिवशी मला असं समजलं की, मायकल जॅक्सन सुद्धा भारतात यायला तयार आहे.”

हेही वाचा : Quiz: मराठी मालिकांचे चाहते आहात? तर ‘दामिनी’ आणि ‘दे धमाल’ मालिकेसंबंधित ‘या’ प्रश्नांची द्या अचूक उत्तरं

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मग काही नामांकित कंपनीची लोक आली. त्यांनी भरत शाहांना सांगितलं आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि तो भारतात आला. याचप्रमाणे मी लता दीदींचे पण शो केले. त्यांनी त्यांचे शेवटचे शो माझ्याकडेच केले. त्यावेळी भूजला भूकंप झाला आणि दीदींचा मला लंडनवरून फोन आला.”

“फोनवर त्या म्हणाल्या ‘राज खरंच खूप भयानक झालंय’ त्यावेळी मी घराच्या गॅलरीत फिरत होतो आणि आता सगळ्यांनाच माहितीये माझ्या घरासमोर शिवाजी पार्क मैदान आहे. त्या मला म्हणाल्या आपण एक शो करूया आणि त्यातून जो काही निधी उभा राहिल तो आपण भूजला देऊया. त्यांनी विचारलं कुठे करुया…मी फेऱ्या मारत असताना त्यांना सांगितलं…शिवाजी पार्कमध्ये करुया. त्यावेळी त्या शोसाठी मैदानात आम्ही १ लाख १० हजार खुर्च्या लावल्या होत्या. पहिल्यापासून माझ्या मनात जो विचार येतो तोच खूप मोठा असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी अडकत नाही” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “मी १२ वर्षे अश्विनची…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने फक्त १५ मिनिटांत केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला…”

दरम्यान, मायकल जॅक्सनचं मुंबई विमानतळावर स्वागत करण्यासाठी स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. खास मराठमोळ्या पद्धतीने त्याचं स्वागत करण्यात आलं होतं. याची अनेक दृश्य आजही युट्यूबवर उपलब्ध आहेत. यानंतर मायकल जॅक्सनने बाळासाहेब ठाकरेंची राहत्या घरी भेट घेतली होती.