भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज जयंती. कित्येक दशकं त्यांनी आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. या ७० हून अधिक वर्षांच्या संगीत कारकिर्दीत त्यांना अनेक माणसं भेटली आणि त्यातली काही त्यांच्या अगदी जवळची झाली. त्यातलेच एक म्हणजे राज ठाकरे. आज लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी भावुक होऊन एका निवेदनातून लता दीदींबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आणखी वाचा : क्रूर औरंगजेब, छत्रपती शिवरायांचे बुद्धीचातुर्य अन् आग्र्याहून सुटकेचा थरार; अंगावर काटा आणणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’चा ट्रेलर प्रदर्शित

राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं, “लतादीदींची आज जयंती. आपल्याला वाढदिवसाच्या मिळणाऱ्या शुभेच्छांचा आनंद असतोच, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात पण विशेष आनंद असतो, त्या व्यक्तींमध्ये दीदी होत्या. त्यांना थेट शुभेच्छा देण्याचा आनंद मला दोन दशकांहून अधिक काळ मिळाला, हे माझं भाग्यच. दीदी गेल्यापासून मी त्यांच्याबद्दल फारसं कुठेच बोललो नाही, सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही. दीदींच्या निधनानंतर एक रितेपणा जाणवायला लागला, आणि ह्या रितेपणाच्या तीव्रतेचा अंदाज येण्यातच मधले काही महिने
निघून गेले. दीदींबद्दल काही लिहायचं ठरवलं तर, त्यांच्या गाण्याबद्दल लिहिणं शक्यच नाही, ते इतकं अत्युच्च आहे की
कितीही त्याला शब्दांत पकडायचं ठरवलं तरी हातातून काहीतरी निसटतच राहतंय असं वाटत राहणार.

पण त्यांचं गाणं जसं दैवी होतं, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दैवी अंश होता आणि ज्याची भुरळ मला त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा पडली आणि ती कायम राहिली आणि पुढेही राहील. हल्ली ‘ब्रँड’ हा शब्द प्रचलित आहे, किंवा राजकीय, सामाजिक जीवनात ‘करिष्मा’ हा शब्द वापरतात, हे निर्माण करण्यासाठी प्रचंड अट्टाहास केला जातो. अशा अट्टाहासातून, ‘ब्रँड’, ‘करिष्मा’ काहीकाळ निर्माण होतो पण तो ओसरतो, निसटून जातो. पण दीदींच्या बाबतीत ते नैसर्गिकपणे आणि सहज घडत गेलं आणि आणि ती घडण्याची प्रक्रिया आणि त्याचं अंतिम टोक ह्या दोन्हींबद्दल दीदी अनभिज्ञ आणि अलिप्त राहिल्या, हे दुर्मिळ आहे.

आयुष्यात फक्त आणि फक्त गाणं ह्या एका गोष्टीवर कमालीचं प्रेम करत, ते आत खोल रुजवत पुढे ते लोकांसमोर ठेवायचं. ते गाणं वरवर सोपं वाटावं पण ते तितकंच कोणालाच पूर्ण गवसू नये इतकं मोठं, अशी साधना केल्यावर जी शांतता, सहजता दीदींच्या वागण्यात आली होती, तिचं वर्णन करायला ऋषितुल्य हाच शब्द मलातरी सुचतोय.

हे असलं सगळं दैवी असतं, ते कधीतरी एकदाच येतं. हे भव्य आणि तरीही अमूर्त वाटणारं ‘दर्शन’ मला अनेकदा जवळून होऊन गेलं. आयुष्यात सर्वोच्च काय असतं हे पाहणं आणि ते अनुभवणं हे भाग्य मला लाभलं हाच माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंद. दीदी जिथे असतील तिथे त्यांना माझा नमस्कार.
आपला, राज ठाकरे”

हेही वाचा : Lata Mangeshkar : एक मुलगी गाते..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लता मंगेशकर यांचा जन्म इंदोरमध्ये झाला होता. २८ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म इंदोर येथील शिख गल्लीमधील एका चाळीमध्ये झाला. लतादीदी सात वर्षांपर्यंत तिथेच वास्तव्यास होत्या. त्यानंतर मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रात आलं. लता मंगेशकर यांनी जगातील ३६ भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाची जादू रसिकांच्या मनावर होती आणि यापुढेही कायम राहील.