Rajat Bedi on Nervous Breakdown : ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमुळे रजत बेदीच्या कारकिर्दीला एक नवीन वळण दिले आहे. अलीकडच्या एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने खुलासा केला की, त्याची प्रकृती इतकी गंभीर झाली होती की, त्याला रात्री झोपण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या.
रजत बेदीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, त्यापैकी एकही चित्रपट त्याच्या कारकिर्दीला अपेक्षित गती देऊ शकला नाही. अलीकडेच तो मानसिक आरोग्य आणि आर्थिक बाबींबद्दल बोलला आहे. तो म्हणाला, “मी अनेक हिट चित्रपटांचा भाग आहे; पण मला माझं मानधन कधीच मिळालं नाही. लोकांना त्यांचं थकलेलं मानधन मिळालं आणि त्यांनी चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केला. मी म्हणालो, “ठीक आहे आणि मग मी पुढच्या प्रोजेक्टकडे वळलो; पण ते हृदयद्रावक होते. मी स्वतःसाठी भविष्य पाहू शकत नव्हतो. कारण- मला जे काम करायचं होतं, त्यासाठी पुरेसं मानधन मिळत नव्हतं. निर्माते मला वेळेवर पैसे देत नसत आणि त्यामुळे माझं नुकसान व्हायचं.”
मी झोपेच्या गोळ्या खायचो : रजत बेदी
रजत त्याच्या नर्व्हस ब्रेकडाऊनबद्दल बोलताना म्हणाला, “एक वेळ अशी आली जेव्हा मला वाटलं की, आता पुरे झालं. मला नर्व्हस ब्रेकडाउन होत होता. मी गोळ्या घेत होतो. रात्री आरामात झोपण्यासाठी मी झोपेच्या गोळ्या घेऊ लागलो. घर कसे चालवायचे याचा सतत विचार करीत असल्यानं मला झोप येत नव्हती.”
त्यानंतर २००७-२००८ मध्ये रजत कॅनडाला गेला आणि तिथे रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. “या प्रवासात त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. व्यवसायात पार्टनरशिपचे प्रश्न निर्माण होऊ लागले. २०१८ मध्ये माझ्या पालकांनी माझा विश्वासघात केला, ज्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं. २०१८ ते २०२१ पर्यंत मी हा आघात सहन केला.” असं रजत म्हणाला.
९० आणि २००० च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसणारा रजत अलीकडेच आर्यन खानच्या ”बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमध्ये दिसला. या सीरिजने त्याला एक नवीन ओळख दिली आहे. रजत बेदी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर होता. ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये रजत बेदीने जज सक्सेनाची भूमिका साकारली आहे.