Rajat Bedi Recalls Past Struggles : बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा रजत बेदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ९० आणि २००० च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसणारा रजत अलीकडेच आर्यन खानच्या ”बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमध्ये दिसला. या सीरिजने त्याला एक नवीन ओळख दिली आहे. पण गेल्या २० वर्षांपासून रजत दुःखी आहे आणि या कठीण काळात त्याची पत्नी त्याच्या पाठीशी उभी राहिली.

रजत बेदीने ‘डिजिटल कमेंटरी’ला मुलाखत दिली आहे. रजत म्हणाला, “लोक फक्त माझं पुनरागमन पाहत आहेत; पण गेली २० वर्षं माझ्यासाठी खूप वेदनादायक होती. माझ्या पत्नीनं मला कधीही सोडलं नाही; माझ्या संघर्षादरम्यान तिनं खूप त्रास सहन केला. आज जेव्हा लोक मला आता ओळखत आहेत, तेव्हा माझ्या कुटुंबालाही हा आनंद जाणवत आहे.”

रजत बेदी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर होता. २००० च्या दशकात जेव्हा त्याची कारकीर्द थांबली तेव्हा त्याला अभिनय सोडून कॅनडाला जावे लागले. रजतने तिथे रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला; पण हा प्रवास सोपा नव्हता. त्याने व्यवसायात फसवणूक आणि वाईट काळाचा सामना केल्याचे उघड केले.

‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये रजत बेदी जज सक्सेनाची भूमिका साकारत आहे, जो इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. मनोरंजक बाब म्हणजे हे पात्र रजतच्या वास्तविक जीवनाशी काहीसे मिळतेजुळते दिसते. रजतने स्वतः खुलासा केला की, आर्यन खानने त्याला पटवून दिले की, तो या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे. या सीरिजमध्ये जजच्या भूमिकेला चांगली पसंती मिळाली.

रजत बेदीने ‘कोई मिल गया’ चित्रपटाव्यतिरिक्त ‘चालबाज’, ‘जानी दुश्मन : अनोखी प्रेम कहाणी’ तसेच ‘रॉकी’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. रजत बेदी ‘कोई मिल गया’ चित्रपटातून चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. या चित्रपटात राज हे खलनायकी पात्र त्याने साकारले होते. या चित्रपटानंतर रजत सिनेसृष्टीत फारसा सक्रिय दिसला नाही. रजतने १९९० मध्ये अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने १९९८ मध्ये ‘दोबारा’ आणि १९९५ मध्ये ‘करण अर्जुन’सारख्या चित्रपटात काम केले होते.