Rajnikanth Costar Struggle Story : चित्रपटसृष्टीतील काही कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री ज्यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली. पण, चित्रपटप्रेमींमध्ये त्यांच्या अभिनयापेक्षा खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिलं आहे. या अभिनेत्री म्हणजे रजनीकांत यांच्याबरोबर झळकलेल्या कनका.

कनका लोकप्रिय अभिनेत्री देविका यांची लेक आहे. ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार कनका यांनी आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं आहे. त्यांनी रजनीकांत यांच्याबरोबरही काम केलेलं. कनकाने १६ व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केलेली. परंतु, त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षीच अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला.

कनका कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. २००२ दरम्यान त्या खूप लोकप्रिय होत्या, पण त्याचवेळी अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं, ज्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. एवढंच नाही तर त्यावेळी त्यांच्या वडिलांनीही त्यांच्यावर जमिनीसंदर्भात गंभीर आरोप केला होता. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार याबद्दल त्यांनी २०१८ मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं.

वडिलांबद्दल कनका म्हणालेल्या की, “माझ्या वडिलांनीच माझ्या आईचं करिअर संपवलं. माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवण्याचं कामही त्यांनीच केलं. मी मानसिक तणावातून जात आहे. माझ्या वडिलांनी माझ्यावर ड्रग्ज घेण्याचा आरोपही केला होता. या सगळ्या कारणांमुळेच मी त्यांच्याशी बोलणं बंद केलेलं. माझ्या आईला भीती होती की ते मला त्यांच्याबरोबर घेऊन जातील आणि या भीतीमुळेच माझं फक्त सहावीपर्यंतचं शिक्षण झालं.”

आता काय करत आहेत कनका

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार कनका सध्या चेन्नईमध्ये स्थायिक आहेत. आता त्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. तामिळ सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री कुट्टी पद्मिनी यांनी कनका यांची भेट घेतलेली आणि त्यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला होता. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्या कनकाबद्दल म्हणाल्या होत्या की, “खूप दिवसांनंतर देविका मॅडमची मुलगी कनकाला भेटले.” त्यावेळी पद्मिनी यांनी कनका त्यांना काय म्हणालेल्या याबद्दलही सांगितलेलं. कनकाबद्दल पद्मिनी म्हणालेल्या, “तिने मला सांगितलेलं की आता मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. दाखवण्यासाठी सगळेच चांगलं वागतात, पण शेवटी सगळेच विश्वासघात करतात; यामुळे मी ठरवलंय की मला आता कोणाची गरज नाहीये.”